PM मोदींच्या भाषणाचा परिणाम; शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 February 2021

लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन आणि नव्या कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन जोरदार भाषण केलं

नवी दिल्ली- लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलन आणि नव्या कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन जोरदार भाषण केलं. आपल्या अडीच तासांच्या लांबलचक भाषणात मोदींनी कृषी कायद्यांचे समर्थन करणारे मुद्दे समोर ठेवले. मोदींनी आंदोलनजीवी आणि आंदोलनकारी या संकल्पनांचा उल्लेख केला. मोदींनी टोल प्लाजा तोडफोड करण्याचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या काही तासानंतरच शेतकरी नेत्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Lok Sabha PM Modi: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

शेतकरी नेत्यांची घोषणा

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर काही तासातच शेतकरी नेत्यांनी घोषणा केल्या आहेत. शेतकरी नेत्यांनी म्हटलं की, आंदोलन आता आणखी तीव्र केले जाईल. शेतकऱ्यांनी जाहीर केलंय की 12 जानेवारीपासून राजस्थानच्या सर्व टोल प्लाजांना टोल फ्री केलं जाईल. याशिवाय रेल्वे रोको कार्यक्रम 18 जानेवारीला देशात 12 ते 4  वाजता आयोजित केला जाईल. तसेच 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या आठवणीत देशभरात कँडल मार्च काढण्यात येईल. 

पंतप्रधान मोदी लोकसभेत काय म्हणाले

पंतप्रधान मोदी लोकसभेत म्हणाले की, टोल प्लाजा तोडणे, त्याच्यावर कब्जा मिळवणे, त्याला चालु न देणे, मोबाईल टॉवर बंद पाडणे अशा प्रकारचे कृत्य आंदोलनाच्या व्याख्यात बसतात का? अशा कृत्यांमुळे पवित्र आंदोलन कलंकित करण्याचे काम होत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की शेतकरी आंदोलनाच्या पवित्रतेला मी मानतो. 

'...आता हे जास्त होत आहे'; लोकसभेत PM मोदी काँग्रेस नेत्यावर भडकले

जे लोक तुरुंगात आहेत, त्यांचे फोटो कशासाठी- मोदी

भारतीय लोकशाहीत आंदोलनाला महात्म्य आहे आणि आंदोलनांचा मी सन्मान करतो. पण काही आंदोलनजीवी पवित्र आंदोलनाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करत आहेत. देशात शेतकरी आंदोलन होत आहे. पण, धार्मिक द्वेष पसरवणारे लोक जे तुरुंगात आहेत, जे दहशतवादी तुरुंगात आहे, नक्षलवाद्यांचे फोटो दाखवून त्यांच्या मुक्तीची मागणी करण्यात येत आहे. अशाप्रकारचे कृत्य आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम नाही का, असा सवाल मोदींनी लोकसभेत केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest more aggressive narendra modi speech in loksabha