
तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी सुरुच आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी सुरुच आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. सरकारने कृषी कायदे रद्द केले नाहीत, तक यावेळी संसदेला घेरले जाईल आणि यावेळी तेथे 40 लाख ट्रॅक्टर येतील, असं ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना तयार राहण्यास सांगितलं आहे. कारण, केव्हाही दिल्लीत येण्याचे आवाहन केले जाऊ शकते. टिकैत मंगळवारी राजस्थानच्या सीकरमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या किसान महापंचायतला संबोधित करत होते. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
न्यायाधीश होणे व कायदेशीर सल्ला देण्याव्यतिरिक्त आहेत वकिलीनंतर अनेक पर्याय !...
केंद्र सरकारने ऐकावं, शेतकरी तेथेच आहेत आणि ट्रॅक्टरही तेथेच आहेत. पुढील आवाहन संसदेला घेरण्याचं असेल. सांगून संसदेवर जाऊ. यावेळी 4 लाख नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन जाऊ, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. शेतकरी इंडिया गेटच्या पार्कमध्ये शेती करेल, पीक उगवेल. संसदेला घेरण्याची तारिख संयुक्त मोर्चा ठरवेल. 26 जानेवारीच्या घटनेवरुन सरकारकडून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचण्यात आला. देशाच्या शेतकऱ्यांना तिरंग्यावर प्रेम आहे, पण या देशाच्या नेत्यांना नाही, असंही ते म्हणाले.
Our next call will be for a march to Parliament, and not just 4 lakh tractors but 40 lakh tractors will go there if farm laws are not taken back: BKU leader Rakesh Tikat at a farmers rally in Sikar, Rajasthan yesterday pic.twitter.com/OCQE9GxsQr
— ANI (@ANI) February 24, 2021
टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांकडून सरकारला खुले आव्हान आहे की त्यांनी कृषी कायदे रद्द करावे आणि एमएसपी लागू करवी, अन्यथा देशातील मोठमोठ्या कंपन्यांचे गोदाम नष्ट करण्याचे काम देशाचे शेतकरी करतील. यासाठी संयुक्त मोर्चा लवकरच तारिख जाहीर करेल. महापंचायतला स्वराज आंदोलनचे नेता योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान सभाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमराम, किसान यूनियनचे राष्ट्रीय महामंत्री चौधरी सिंह यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.
जगातील सर्वात महागड्या बिर्याणीची किंमत माहितीय का? जाणून घ्या, का आहे खास
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवली होती, पण कायदे मागे घेण्यास नकार दिला होता. कायद्यांचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला दिल्लीत आंदोलन केले. यावेळी लाल किल्ला परिसरात हिंसाचार घडून आला. त्यामुळे कृषी आंदोलनाला गालबोट लागले. मात्र, टिकैत यांनी दिल्ली सीमेवर आंदोलन सुरुच ठेवले आहे.