आठवण 32 वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनाची; राजीव गांधी सरकारला झुकवणारा रांगडा नेता

mahendra singh tikait.
mahendra singh tikait.

नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे प्रदर्शन 5 व्या दिवशीही सुरु आहे. हजारो शेतकरी नोव्हेबरच्या थंडीमध्ये दिल्लीत ठाण मांडून आहेत. असेच दृष्य 32 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये पाहायला मिळाले होते. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीमध्ये एकत्र आले होते. शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात 5 लाख शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या वोट क्लबमध्ये रॅली केली होती. 

जेव्हा-जेव्हा शेतकरी आंदोलनांचा उल्लेख होता, तेव्हा महेंद्र सिंह टिकैत यांचा उल्लेख नक्की केला जातो. टिकैत यांचा अंदाज वेगळा होता, ते आंदोलनादरम्यान हुक्का पीत शेतकऱ्यांशी चर्चा करायचे. एक काळ असाही आला होता, जेव्हा त्यांच्या नेतृत्वातील आंदोलनामुळे सत्ताधारी पक्षाच्या सभेची जागा बदलावी लागली होती. 

एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी

महेंद्र सिंह टिकैत यांना शेतकऱ्यांचा तारणहार म्हटलं जायचं. शेतकरी त्यांना बाबा टिकैत म्हणायचे. त्यांची शेतकऱ्यांवर इतकी पकड होती की, त्यांच्या एका हाकेने लाखो शेतकरी जमा व्हायचे. अशाच प्रकारचे वातावरण तेव्हा दिल्लीमध्ये तयार झाले होते. 25 ऑक्टोबर 1988 मध्ये महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात दिल्लीत रॅली काढण्यात आली होती. 

विज, सिंचनाचे दर कमी करणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासह 35 सूत्री मागण्यांसाठी पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीत आले होते. प्रशासनाने शेतकऱ्यांना लोनी बॉर्डरवर रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त शेतकरी दिल्लीत धडकले. 

14 राज्यातील 5 लाख शेतकरी

14 राज्यातील जवळजवळ 5 लाख शेतकरी त्यावेळी दिल्लीत आले होते. शेतकऱ्यांनी विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत ठाण मांडले होते. संपूर्ण दिल्ली ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आणि बैलगाड्याही सोबत आणल्या होत्या.

त्यावेळी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीसाठी तयारी सुरु होती. ज्याठिकाणी तयारी सुरु होती, त्याच ठिकाणी शेतकरी जमा झाले. टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा देत म्हटलं होतं की, सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीये, त्यामुळे ते येथे आले आहेत. टिकैत यांनी शेतकऱ्यांसोबत मिळून 7 दिवसांपर्यंत धरणे आंदोलन केले. 

टिकैत यांच्या नैतृत्वामध्ये 12 सदस्यीय कमिटीची स्थापना करण्यात आली. कमिटीने तत्कालीन राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली, पण काहीही निर्णय होऊ शकला नाही. प्रदर्शनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी 30 ऑक्टोबर 1988 मध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. तरीही शेतकरी मागे हटले नाहीत. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला इंदिरा गांधीच्या पुण्यतिथी सभेची जागा बदलावी लागली होती. वोट क्लब ऐवजी लालकिल्याच्या मागच्या मैदानात ही सभा झाली. 

सरकारला अखेर झुकावं लागलं

टिकैत यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना तिखट शब्दात सुनावलं होतं. प्रधानमंत्र्यांनी आमच्यासोबत शत्रूसारखा व्यवहार केला आहे. शेतकऱ्यांची नाराजी त्यांना महागात पडेल, असं ते म्हणाले होते. अखेर सरकारला शेतकऱ्यांच्या विरोधापुढे झुकावे लागले. राजीव गांधी यांनी सर्व 35 मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर 31 ऑक्टोबर 1988 ला आंदोलन मागे घेण्यात आले. या यशामुळे टिकैत यांच्या नावाला वेगळी उंची मिळाली होती. 

( edited by- kartik pujari)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com