..तर "यूपी'तही मंदसोरसारखा वणवा भडकेल 

पीटीआय
शुक्रवार, 9 जून 2017

उत्तर प्रदेशातील ऊस आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोचला असून सरकारने वेळीच उपाययोजना आखल्या नाही, तर मध्य प्रदेशसारखा वणवा "यूपी'तही भडकू शकतो, असा इशारा राज्यातील शेतकरी संघटनांनी दिला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशातील ऊस आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोचला असून सरकारने वेळीच उपाययोजना आखल्या नाही, तर मध्य प्रदेशसारखा वणवा "यूपी'तही भडकू शकतो, असा इशारा राज्यातील शेतकरी संघटनांनी दिला आहे. "भारतीय किसान युनियन'ने शहरांना होणारा दूध आणि भाज्यांचा पुरवठा रोखण्याची धमकी दिली आहे. मंदसोरमधील घटनेची "सीबीआय' चौकशी करत या प्रकरणी "एफआयआर' दाखल केला जावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

"यूपी'तील योगी सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली असली तरीसुद्धा राज्यातील पायाभूत सुविधा आणि थकीत कृषी देयकांचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. आता तर राज्यामध्ये कथित गोरक्षकांची दादागिरी वाढली असून, यामुळे कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत, असेही संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी उसळलेल्या आंदोलनाप्रती सहानुभूती व्यक्त करताना संघटनेने राज्यामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अन्य राज्यांमधील आंदोलने पाहून आमचा उत्साह आणखी वाढला आहे, या लढ्यामध्ये आम्हीही सहभागी होणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी सांगितले. 

किसान मंच आक्रमक 
"राष्ट्रीय किसान मंच' या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर दीक्षित यांनीही योगी आदित्यनाथ यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही, तर येथेही मंदसोरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या या कर्जमाफीशी निगडित नसून त्या पिकांच्या हमीभावाशी निगडित असल्याचे त्यांनी नमूद केले. 

तमिळनाडूमध्येही आंदोलन 
उत्तरेतील राज्यांमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता तमिळनाडूतील शेतकरीही मैदानात उतरला आहे. दुष्काळी पॅकेजची मागणी करत या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश दिले होते, न्यायालयाच्या या आदेशचे सरकारने पालन करावे, असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: farmer strike up mandsor farmer agiation