
देशाच्या राजधानीत नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा फटका आता रिलायन्स जिओला बसत असून पंजाबमधील जवळपास 1500 हून अधिक टॉवरला नुकसान पोहोचवलं आहे.
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा फटका आता रिलायन्स जिओला बसत असून पंजाबमधील जवळपास 1500 हून अधिक टॉवरला नुकसान पोहोचवलं आहे. काही टॉवर्सची मोडतोड करण्यात आली आहे तर काही टॉवरचे वीज कनेक्शन बंद करण्यात आलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी जिओची सेवा खंडीत झाली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितलं की, राज्यात मोबाइल टॉवरची तोडफोड आणि दूरसंचार सेवांमध्ये अडथळा आणू नये अन्यथा पोलिस याप्रकरणी कठोर कारवाई करतील. गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचा रिलायन्सविरोधात राग उफाळून आला आहे. वीज कनेक्शन बंद करणे, टॉवरची केबल कापण्याचे प्रकार होत आहेत.
मुकेश अंबानी यांच्या मालकीचे असलेल्या जिओ टॉवर्सला अशा पद्धतीनं नुकसान पोहोचवलं जात आहे. कृषी कायद्यामुळे अंबानी, अदानी या उद्योगपतींचा फायदा होत असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे. जालंधर इथं जिओच्या फायबर केबलचे काही बंडल जाळले गेले. जिओच्या कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचे आणि पळवून लावण्यात आल्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे वाचा - भारतातही सापडले ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण, 6 प्रवासी पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारे अशांतता, खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून दिलं जाणार नाही. राज्यात शांततापूर्ण आंदोलनावर कोणताही आक्षेप नाही. मात्र अशा प्रकारे एखाद्याच्या मालमत्तेचं नुकसान केलं जात असेल तर ते सहन केलं जाणार नाही.
संपर्क माध्यमांना तोडल्यानं विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. सध्या विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. याशिवाय कोरोनामुळे अनेक लोक घरातून काम करत असून दूरसंचार सेवा खंडीत झाल्यानं त्यावर परिणाम होत आहे. एवढंच नाही तर बँकिंग सेवासुद्धा यामुळे बंद राहिल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.
हे वाचा - रजनीकांत म्हणतात 'नो पॉलिटिक्स', आरोग्याचे कारण देत राजकारणातून माघार
नव्या कृषी कायद्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी आणि अदानी यांना सर्वाधिक फायदा होईल असा आरोप आंदोलक शेकऱ्यांनी केला आहे. यामुळेच शेतकरी त्यांचा राग मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ मोबाइल टॉवरवर काढत आहेत. राज्यातील अनेक भागात टॉवर बंद पाडण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले गेले आहेत.