'अन्नदाता धरणे देतोय आणि 'असत्य' टिव्हीवर भाषण'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

राहुल गांधी यांनी ऑक्टोबर महिन्यात या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भुमिका घेत 'ट्रॅक्टर रॅली' काढली होती.

नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. एनडीएचा घटकपक्ष असलेला अकाली दलदेखील या मुद्यावरुन सरकारमधून बाहेर पडला आहे. तसेच या कायद्याविरोधात विरोधकांनीही रान उठवलं आहे. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने अंहकार नष्ट करायला हवा, असं म्हटलंय.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या बिर्याणीवरुन पोटदुखी; काय खातात पेक्षा काय बोलतात ते महत्त्वाचं नाही का?

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून ट्विट करुन सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलंय की, अन्नदाता रस्त्यांवर- मैदानावर धरणे देत आहे, तर 'असत्य' टिव्हीवर भाषण देत आहे. शेतकऱ्याच्या कष्टाचे आपल्या सगळ्यांवरच कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय आणि हक्क देऊनच फिटेल. त्यांच्यावर अश्रूधूर आणि लाठीमार करुन, त्यांना झिडकारुन त्यांचं हे आपल्यावरचं कर्ज फिटणार नाही. उठा, जागे व्हा! अंहकाराच्या खुर्चीवरुन उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांना अधिकार द्या!

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आपल्या ट्विटरवरुन सातत्याने या कायद्याविरोधात आपली मते मांडत आहेत. राहुल गांधी यांनी ऑक्टोबर महिन्यात या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भुमिका घेत ट्रॅक्टर रॅली काढली होती. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला होता. काँग्रेस  पक्षाने या कायद्यांना असलेला आपला विरोध हा पहिल्यापासूनच दर्शवला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात रॅली 4 ते 6 ऑक्टोबर या दरम्यान पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. 

हेही वाचा - कोणत्याही अटीविना चर्चेवर शेतकरी ठाम; केंद्र सरकार करणार आजच चर्चा
पावसाळी अधिवेशनात ही कृषी विधेयकं मांडण्यात आली होती. सभागृहात आवाजी मतदानाने ती मंजूरदेखील करण्यात आली. शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे ते तीन कायदे आहेत. या कायद्याला विरोधकांचा विरोध असला तरीही आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सहिने त्यांचं कायद्यात रुपांतरण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers are protesting while lie is orating rahul gandhi alleged modi government