esakal | शेतकऱ्यांचा आज काळा दिवस; आंदोलनाला ६ महिने पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

farmer protest

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज देशभरात शेतकरी काळा दिवस पाळत आहेत. याला देशभरातील १२ प्रमुख विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांचा आज काळा दिवस; आंदोलनाला ६ महिने पूर्ण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या (New farm laws) विरोधात मैदानात उतरलेल्या शेतकऱ्यांनी आज काळा दिवस (Black Day) साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. काळा दिवस पाळून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. देशभरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा द्यावा, तसेच आपल्या घरांवर तसेच वाहनांना काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळूनही निषेध व्यक्त करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली-हरयाणाच्या सिंघू बॉर्डरवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (farmers protest completed 6 months to mark black day)

हेही वाचा: बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ - मोदी

सहा महिन्यांपासून आम्ही राष्ट्रीय तिरंगी ध्वज खांद्यावर घेऊन आंदोलन केले. केंद्र सरकार आमचं म्हणणं ऐकेल, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. त्यामुळे आज सहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी काळा दिवस पाळावा, असे आवाहन केले आहे. शांततेत हे आंदोलन पार पडेल. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. शेतकरी जेथे आहेत, तेथे काळा झेंडा दाखवून सरकारचा निषेध करत आहेत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी सांगितले. शेतकरी नेत्यांनी केलेल्या आवाहनाला पंजाबमधील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत आपल्या घरावर तसेच ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावले आहेत.

हेही वाचा: Yaas Cyclone : पाच विमानतळ बंद; NDRF ची 115 पथके तैनात

टिकेत पुढे म्हणाले, 'नव्या कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास शेतकरी तयार आहेत. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारदरम्यान ११ बैठका पार पडल्या, पण कोणताही तोडगा निघालेला नाही. २२ जानेवारीला शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.'

१२ विरोधी पक्षांचा पाठिंबा

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज देशभरात शेतकरी काळा दिवस पाळत आहेत. याला देशभरातील १२ प्रमुख विरोधी पक्षांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, जेडीएस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), जेकेपीए, सपा, बीएसपी, आरजेडी, सीपीआय, सीपीएम आणि आप यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.