सिंघू बॉर्डरवरील शेतकऱ्यांवर गोळीबार; कारमधून आलेले चार आरोपी फरार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 March 2021

गेल्या 100 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या 100 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. काल रविवारी रात्री अचानक काही लोक कारमधून आले आणि त्यांनी गोळीबार करुन ते पसार झाले आहेत. या कारमध्ये चार लोक होते, ज्यांनी शेतकऱ्यांवर निशाणा साधत फायरिंग केली. द ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षण : पुढील सुनावणी आता 15 मार्चला; आधीचं वेळापत्रक रद्दबातल

चंदीगढचा नंबर असणाऱ्या एका कारमधून काही लोक आले होते. पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारमधून उतरलेल्या या इसमांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नाहीये. ही घटना सिंघू बॉर्डरवरील टीडीआय मॉलजवळ घडली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार करणारे हे आरोपी कदाचिक पंजाबचे रहिवासी होते. 

हेही वाचा - स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी; सार्वजनिक ठिकाणी झाकता येणार नाही चेहरा

सिंघू बॉर्डरवर गेल्या 26 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी आंदोलन  पुकारले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना काल रात्री लंगर सुरु असताना घडली आहे. फायरिंग करणारे हे आरोपी कदाचित पंजाब अथवा चंदिगढचे रहिवासी असावेत. कारण ते ज्या गाडीतून आले होते त्या गाडीचा नंबर चंदिगढचा होता. या घटनेची माहिती मिळताच हरियाणातील कुंडली गावातील पोलिस घटनस्थळी आले आणि त्यांनी तपास सुरु केला आहे. सध्या पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Protest firing at farmers on singhu border sunday night