esakal | आंदोलक शेतकऱ्यांची दिल्ली सीमेवर होळी साजरी; कृषी कायद्याच्या जाळल्या प्रती
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers HOLI

दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डरवर गाझीपूरमध्ये गेल्या 123 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नाचगाणे करुन होळी साजरी केली.

आंदोलक शेतकऱ्यांची दिल्ली सीमेवर होळी साजरी; कृषी कायद्याच्या जाळल्या प्रती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली :  रंगांचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. देशावर सध्या कोरोनाचं संकट असलं तरी पुरेशी काळजी घेऊन उत्साह तोच राखून होळी खेळण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यानच तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील जोरदार उत्साहाने होळी साजरी केली आहे. त्यांच्या या उत्साहपूर्ण रितीने होळी साजरे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसतंय की आंदोलक शेतकरी नाचगाणे करत एकमेकांना रंग लावून होळी साजरी करत आहेत. 

123 दिवसांपासून करताहेत आंदोलन
त्यांच्या या उत्साहाचा व्हिडीओ एएनआयने प्रसारित केला आहे. सोबत त्यांनी लिहलंय की, दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डरवर गाझीपूरमध्ये गेल्या 123 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नाचगाणे करुन होळी साजरी केली. या दरम्यान एका शेतकऱ्याने म्हटलंय की, सरकारने आमच्या मागण्या केल्या पाहिजेत आणि तीन नव्या कृषी कायद्यांना रद्दबातल केलं पाहिजे जेणेकरुन आम्ही घरी जाऊ शकू. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांवर धीरोदात्तपणे ठाम आहेत. शेतकऱ्यांनी निर्धार केलाय की, जोवर सरकार या तीन कृषी कायद्यांना रद्द करत नाही आमि मिनीमम सपोर्ट प्राईझ अर्थात एमएसपीची गॅरंटी देत नाही तोवर हे आंदोलन सुरुच राहिल. 

हेही वाचा - WHOचा रिसर्च रिपोर्ट झाला लीक; कोरोना पसरण्यामागचं उलगडलं रहस्य

'होलिका दहन'मध्ये जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती
आपल्या मागण्यांवर शेतकरी ठाम असून त्यांनी 'होलिका दहन'च्या दरम्यान तीन नव्या कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या. संयुक्त किसान मोर्चाच्या एका वक्तव्यात म्हटलं गेलंय की, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर होळी साजरी केली. तसेच हा निर्धार व्यक्त केला की जोवर हे काळे कायदे रद्द केले जात नाहीत तोवर हा लढा सुरुच राहिल. तसेच आंदोलकांकडून हे जाहीर करण्यात आले की, येत्या 5 एप्रिल रोजी 'FCI बचाव दिवस' साजरा केला जाईल. तसेच देशभरात सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत Food Corporation of India अर्थात FCI च्या कार्यालयांना घेराव घातला जाईल. 

loading image