आंदोलक शेतकऱ्यांचे भयानक हाल; बॅरिकेडींगमुळे शौचालयाची गैरसोय, पाण्याची टंचाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

सुमारे अर्धा फूट उंचीचे खिळे पोलिस प्रशासनाकडून रस्त्यावर पेरण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत या ठिकाणी आपल्या ठाम निर्धारासह धरणे धरुन आहेत. काल दिल्ली पोलिसांनी या आंदोलनस्थळी उभारलेल्या भयानक अशा बॅरिकेडींगचे फोटो समोर आले होते. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत.

सुमारे अर्धा फूट उंचीचे खिळे पोलिस प्रशासनाकडून रस्त्यावर पेरण्यात आले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांची ये-जा बंद करण्यात येईल आणि त्यांची कोंडी करता येईल. सरकार हरतर्हेचे मार्ग वापरून हे आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच आता शेतकऱ्यांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचयला अडचण निर्माण होत असल्याने पाण्याची टंचाई होत आहे. तसेच शेतकऱ्यांना मोबाईल टॉयलेट्सच्या ठिकाणी देखील पोहोचणे कठीण होत आहे. 

हेही वाचा - देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश

सरकारने उभ्या केलेल्या बॅरिकेडींगमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. अनेक अडचणी असल्या तरीही या आंदोलनाची तीव्रता जराही कमी झाली नाहीये. यातील एक आंदोलक शेतकरी कुलजित सिंग यांनी म्हटलं की, आम्ही शेतकरी आहोत त्यामुळे गरज भासल्यास बोअरवेल खणून पाणी काढू. आम्ही घाबरुन जाणाऱ्यातले आहोत, असा विचार सरकारने करु नये. 

दिल्ली पोलिसांनी याआधी वीज आणि पाण्याची सेवा खंडीत केली होती. तसेच इंटरनेटची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता काल उभारण्यात आलेले बॅरिकेडींगमुळे सरकारबद्दल रोष आहे. सध्या आंदोलनस्थळी कमी मोबाईल टॉयलेट्स असल्याने शेतकरी आंदोलकांची गैरसोय होत आहे. शौचालयांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे. अनेकांना उघड्यावर शौचाला जावे लागत असून महिलांचीही गैरसोय होत आहे. याबाबत बोलताना भारतीय किसान युनियनचे मनजित ढिल्लन यांनी म्हटलंय की, शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखणे हा या बॅरिकेडींगचा उद्देश नसून मुलभूत सुविधांपासून रोखण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी दिल्लीच्या बाजूने आमच्यापर्यंत पाण्याचे टँकर येत होते पण आता बॅरिकेडींगमुळे यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी विकत घ्यायची वेळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers protest governments barricadings no access to water toilets for farmers