शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सिंघू बॉर्डरवर वरात; नवरदेव म्हणाला, कायदे रद्द करण्याची सरकारने द्यावी भेट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

दिल्लीमध्ये कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातून समर्थन मिळत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण देशभरातून समर्थन मिळत आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक महिन्यापासून प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे, ही एकच मागणी जोर लावून धरली जात आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनाला समर्थन देत आहेत. मंगळवारी पटियालातील एक शेतकरी सिंघू बॉर्डरवर चक्क वरातीसकट पोहोचल्याची घटना घडली आहे. 22 वर्षीय शेतकरी साहिब सिंह हे सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी यावेळी बँडबाजावर डान्स करत सरकारच्या विरोधात नारेबाजी देखील केली. तसेच या विवाहासाठी भेटवस्तू म्हणून सरकारकडून हे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. 

शेतकऱ्यांनी वरातीचं केलं स्वागत
तिथे उपस्थित असणाऱ्या आंदोलकांनी वरातीचं स्वागत केलं आहे. तसेच आंदोलकांनी या नवरदेवाला शगुन देखील दिला आहे. सोबतच या वरातीत सामिल होऊन त्यांनी डान्स देखील केला आहे. नवरदेवाने यावेळी म्हटलंय की, लोक वेगवेगळ्या पद्धतीने विरोध प्रदर्शित करुन सरकारचे डोळे उघडण्याचे काम करत आहेत. मला वाटतंय की जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. 

हेही वाचा - भारत-चीन तणाव : "लष्करी पातळीवर चर्चा सुरु पण अद्याप तोडगा नाही - राजनाथ सिंह

आंदोलनाचा एक महिना
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय जराही ढळलेला नाहीये. आतापर्यंत सरकारसोबत आंदोलकांच्या चर्चेच्या पाच बैठका झाल्या असून तोडगा निघाला नाहीये. आज बुधवारी पुन्हा एकदा शेतकरी संघटनांशी केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा असून सगळ्या देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सरकार शेतकऱ्यांची समजूत घालण्याच्या प्रयत्नात आहे मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर अगदी ठाम आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers protest groom arrived singhu border with baraatis demanded to repeal farm laws