esakal | 'सरकारनं भींती उभारायचं काम करु नये'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul gandhi

गेल्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या धुमश्चक्रीनंतर शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा आपला निर्धार  पक्का करुन सरकारला नमवण्यासाठी कंबर कसली आहे.

'सरकारनं भींती उभारायचं काम करु नये'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आंदोलन सुरु आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाम निर्धारासह गेल्या 68 दिवसांपासून धरणे धरुन बसले आहेत. गेल्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या धुमश्चक्रीनंतर शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा आपला निर्धार  पक्का करुन सरकारला नमवण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे सरकार हरतर्हेने शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. आंदोलन स्थळी इंटरनेट, वीज-पाण्याची सुविधा बंद केली गेली आहे. तसेच जाण्यायेण्याचे मार्ग देखील रस्त्यात टोकदार मोठे खिळे ठोकून बंद केले गेले आहेत. मजबूत असं बॅरिकेडींग केलं गेलं आहे. यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यानी टीका केली आहे. 

त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेतकरी आंदोलनातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पोलिसांनी तयार केलेलं भलंमोठं तगडं असं बॅरिकेडींग तसेच टोकदार खिळे दिसून येत आहेत. या फोटोंना शेअर करत राहुल गांधी यांनी म्हटलंय की, भारत सरकार, पुलांची निर्मिती करा, भींती उभारायचं काम करु नका. पोलिसांनी गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 

दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील आपलं आंदोलन तीव्र करण्यासाठी पावलं उचलली आहेत. येत्या 6 फेब्रुवारी रोजी देशभरात तीन तासांसाठी चक्का जाम करण्याचे आंदोलन शेतकऱ्यांनी जाहीर केलं आहे. 

हेही वाचा - Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम; आंदोलन होणार आणखी तीव्र

या शेतकरी आंदोलनावरुन आज संसदेत सकाळी गोंधळ पहायला मिळाला. राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात विविध विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उठवत त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. या गोंधळामुळे सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आले. सभापती वेंकय्या नायडू यांनी विरोधकांच्या मागणीला नकार देत म्हटलं की, सदस्य बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेवर आपलं मत मांडू शकतात.