
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रत्यक्ष संसदेत आणि संसदेबाहेर देखील चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज गाझीपूर येथे जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 11 बैठका होऊनसुद्धा अद्याप यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. दरम्यान आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रत्यक्ष संसदेत आणि संसदेबाहेर देखील चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज गाझीपूर येथे जाऊन राकेश टिकैत यांची भेट घेतली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दुपारी गाझीपूर सीमेवर जाऊन टिकैत यांची भेट घेतली. याठिकाणी आंदोलनाच्या मुख्य व्यासपीठावर राऊत हे शेतकरी नेते टिकैत यांना भेटले. 26 जानेवारीचा हिंसाचार ज्या पद्धतीने झाला तो शेतकरी आंदोलन दडपून टाकण्यासाठीचा प्रयत्न होता. महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना शेतकऱ्यांच्या बरोबर आंदोलनात ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
Gazipur Border
म्हारो टिकैत... pic.twitter.com/5cIAuhHJMn— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
दरम्यान, संजय राऊत यांनी राकेश टिकैत यांच्या भेटीनंतर ट्विटरवरून एक फोटोही शेअर केला आहे. दोघेही हात उंचावल्याचं यामध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना संजय राऊत यांनी 'Gazipur Border, म्हारो टिकैत...' एवढंच कॅप्शन दिलं आहे.
हे वाचा - शेतकरी आंदोलनाच्या ज्वाळा कायम; 'बहुत लंबा चलेगा रे दंगल हमारा'
टिकैत यांनी या भेटीनंतर सांगितलं की, शेतकऱ्यांचा विरोध हा राजकीय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला व्यासपीठावर जागा किंवा बोलण्यासाठी संधी दिलेली नाही. 2019 पर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील शिवसेना हा एक पक्ष आहे. त्यांनी 29 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. याआधी अनेक पक्षांच्या नेत्यांनी गाझीपूर दौरा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आमचं आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी मागण्यांवर ठाम आहेत.
हे वाचा - 'राम मंदिराच्या नावे पैसे गोळा करुन दारू पितात'; काँग्रेस आमदाराचा भाजप नेत्यांवर आरोप
कृषी कायदे हे निवडक उद्योजकांना लाभ मिळवून देणारे व शेतकऱ्यासाठी अत्यंत घातक असल्याचे टिकैत यांनी सांगितले. पोलिसांनी ज्या पद्धतीने अडथळे उभारले आहेत ते पाहता देशातील नागरिकांची रोटी देखील लवकरच बंद होईल, अशी टीका त्यांनी केली. हे कायदे रद्द करावेत व हमीभावावर आधारित (एमएसपी) नवा कायदा करावा, या आमच्या मागण्या आजही कायम आहेत असेही त्यांनी सांगितले. सरकारची ताठर भूमिका कायम राहिल्यास हे आंदोलन ऑक्टोबरपर्यंत चालविण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. पुढील तारखा ऑक्टोबरमध्ये जारी होतील असे आम्ही सरकारला कळविल्याचेही टिकैत यांनी सांगितले.