तूरखरेदीची चौकशी करा; काँग्रेसची आग्रही मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 जून 2017

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने आता राज्यातील तूरखरेदीच्या चौकशीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडून अल्पदराने तूरखरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सरकारने ती खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा असल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी आरोप वजा मागणी काँग्रेस सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी आज केली.

प्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केलेल्या कर्जमाफीवरही प्रश्‍न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार असेल, तर मग त्यापासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, असा सवाल मोहन प्रकाश यांनी केला.

पश्‍चिम महाराष्ट्रातील अल्पभूधारक अडीच एकर शेतीमध्ये ऊसाचे नकदी पीक घेतात; पण विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 50 बिघे शेतीतूनही फारसे उत्पन्न हाती लागत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच तूरखरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही मोहन प्रकाश यांनी केला. तुरीचे किमान समर्थन मूल्य (एमएसपी) 5050 रुपये आहे; मात्र वैतागलेल्या शेतकऱ्यांना तूर अवघ्या 3100-3229 रुपये दराने व्यापाऱ्यांना विकावी लागते आहे आणि सरकार मात्र याच व्यापाऱ्यांकडून 5050 या एमएसपी दराने ती खरेदी करते आहे. महाराष्ट्रातील तब्बल 60 ते 70 टक्के तूरखरेदी व्यापाऱ्यांकडून झाली असून, सरकारच्या नाकाखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे. या खरेदीची चौकशी झाल्यास सत्य समोर येईल, असे आव्हान मोहन प्रकाश यांनी दिले.

Web Title: farmers strike maharashtra news India news Congress BJP Devendra Fadnavis