आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पंजाब राज्य सरकारकडून मदत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

या आंदोलनात अनेक वयस्कर शेतकरी तसेच महिला आणि लहान मुले देखील सामिल झाली आहेत.

चंदीगढ : गेल्या 9 दिवसांपासून केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले आहेत. मुख्यत: पंजाब आणि हरियाणा भागातले हे शेतकरी ऐन थंडीत दिल्लीत आंदोलन करत आहेत. आधी दिल्लीत प्रवेश करण्यापासून त्यांना रोखण्यासाठी सरकारने त्यांच्यावर पाण्याचा फवारा तसेच अश्रूधूराचाही वापर केला. मात्र शेतकरी मागे हटले नाहीत. या आंदोलनात अनेक वयस्कर शेतकरी तसेच महिला आणि लहान मुले देखील सामिल झाली आहेत. यात काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आणि आता या आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. 

पंजाब सरकारने काल गुरुवारी या आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मानसा जिल्ह्यातील बछोना खेड्यातील रहिवासी गरुजत सिंग (60) हे आंदोलनादरम्यान दिल्लीच्या टिकरी सीमेवर मरण पावले. तर मोगा जिल्ह्याच्या भिंदर खुर्द खेड्यातील रहिवासी असलेले गुरबचन सिंग (80) हे मोगा येथील आंदोलनाच्या वेळीच बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. 

हेही वाचा - Farmers Protest: आंदोलनाचा चेहरा बनलेल्या सुखदेव यांनी सांगितलं 'त्या' फोटोमागील सत्य!

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा एका सरकारी पत्रकाद्वारे केली आहे. अमरिंदर सिंग यांनी पहिल्यापासूनच या कायद्याविरोधात भुमिका घेतली आहे. पंजाब विधानसभेतही त्यांनी या कायद्यांविरोधातील कायदा मंजूर करुन घेतला आहे. हे आंदोलन सुरु झाल्यावर दिल्लीतील प्रवेश नाकारला जात असताना अमरिंदर सिंह यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी सौजन्याने वागण्याचे तसेच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचे आवाहन केले होते.

काल गुरुवारी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती. नवी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी ही चर्चा झाली. त्यांनी केंद्राला आवाहन केले की दोन्हीही पक्षांनी कठोर भुमिका न घेता लवकरत एक सामायिक तोडगा अंमलात आणावा. तसेच ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे पंजाबच्या अर्थव्यवस्थेवर तसेच देशाच्या सुरक्षिततेवर परिणाम होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers who died in the agitation punjab government announced compensation the families of