नरेंद्र मोदींचे कृषी धोरण कौतुकास्पद : स्वामिनाथन 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधील शेतकरी आंदोलनावरही स्वामिनाथन यांनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधांमध्ये रचनात्मक बदल घडवून आणायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली - आघाडीचे कृषी संशोधक आणि शेतकरीविषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणाचे कौतुक केले आहे. कृषी आयोगाने केलेल्या अनेक शिफारशींची अंमलबजावणी मोदी सरकारने केली असून, यामुळे शेतीमध्ये सुधारणा होईल, असे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, मृदा आरोग्य कार्ड, सुधारित विमा योजना उपलब्ध करून देण्याबरोबरच सिंचनाखालील क्षेत्रामध्येही सरकारने मोठी वाढ केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कृषी विद्यापीठे आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवरही स्वामिनाथन यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामीण भागातील महिलांचा कृषी कामांमध्ये मोठा वाटा असून त्यांना कृषी विद्यापीठे आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधील शेतकरी आंदोलनावरही स्वामिनाथन यांनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधांमध्ये रचनात्मक बदल घडवून आणायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले. 
 

Web Title: Father of Indian Green Revolution, MS Swaminathan hails Narendra Modi government