पित्याने 14 वर्षीय मुलीला विकले 7 लाखांना

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे गावकरी जमा झाले. त्यांनी नंतर तिला पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी नेले.

जयपूर- एका नराधमाने तीन साथीदारांच्या मदतीने चक्क स्वतःच्याच 14 वर्षीय मुलीला 7 लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील लक्ष्मणगडजवळील बुटोली येथे हा प्रकार घडला. 

बलबीर असे त्या पीडित मुलीच्या पित्याचे नाव असून, त्याने हरियानामधील लोकांशी सौदा करून एका 35 वर्षांच्या एका व्यक्तीशी लग्न करण्यासाठी तिची विक्री केली. त्याने आधीच त्या व्यक्तीकडून आगाऊ रक्कम घेतली होती. 

'एका आलिशान SUV कारमध्ये आपल्याला जबरदस्तीने बसविले आणि घेऊन जात असताना वडीलही सोबत होते,' असे त्या मुलीने पोलिसांना सांगितले. 
"मी ओरडले आणि माझे आजी-आजोबा माझ्या मदतीला धावून आले. ते चार मला पळवून नेत होते. त्यापैकी माझे वडील एक होते," असे तिने सांगितले. 

पीडित मुलीच्या ओरडण्यामुळे गावकरी जमा झाले. त्यांनी नंतर तिला पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी नेले. मानवी तस्करी कायदा आणि अपहरण कायदा, 1984 नुसार चौघांविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. 
 

Web Title: Father, Three Others Arrested For Selling Off Minor Girl