Cyclone Updates :मंदौस चक्रीवादळामुळे शेतकरी भयभीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mandous cyclone

Cyclone Updates :मंदौस चक्रीवादळामुळे शेतकरी भयभीत

सकाळ डिजिटल टीम

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ‘मंदौस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या वादळामुळे अवकाळी पाऊस पडू शकतो आणि शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

mandous cyclone भीती कधीपर्यंत ?

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन हे चक्रीवादळ येत आहे. त्याला मंदौस किंवा मॅन डौस असं म्हटलं जातं.

हवामान विभागाने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. पण आता महाराष्ट्रालासुद्धा याची भीती असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हे वादळ 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुमारास 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा बेट ओलांडण्याची शक्यता आहे या वादळाचा प्रभाव 10 डिसेंबरपर्यंत राहील असे म्हटले जात आहे.

दक्षिण भारतातील सर्वच किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: Cyclon Mandous High Alert : महाराष्ट्रावर घोंगावतय आस्मानी संकट, हवामान विभागाने दिला हायअलर्ट

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची भीती

‘मंदौस’ चक्रीवादळ महाराष्ट्रावरही परिणाम करण्याचा धोका आहे. या चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस पडू शकतो.

या वादळामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने ढगाळ वातावरण तयार होऊन, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.

प्रामुख्याने आज म्हणजे (9डिसेंबर) रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसंच यामुळे राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढसुद्धा होऊ शकेल.

‘मंदौस’ चक्रीवादळाचा वेग बुधवारी सकाळी ताशी 50 ते 60 कि.मी. इतका होता. रात्री तो 70 ते 80 कि.मी. झाला. गुरुवारी (8 डिसेंबर) हा वेग 80 ते 90, तर शुक्रवारी 100 कि.मी.वर जाईल, असा अंदाज आहे.

अवकाळी पावसाने काय होते?

अवकाळी पाऊस पिकांसाठी बहुतांशवेळा नुकसान करणाराच असतो. कारण पिकांच्या वाढीच्या चक्रावर तो परिणाम करत असतो. तसेच त्यामुळे काहीवेळा पिकांवर रोग येण्याची, मोहोर गळून जाण्याचीसुद्धा शक्यता असते.

कोकणातील शेतकऱ्याला भीती नुकसानीची

सध्या आमच्याकडे काजूला फुलोरा येऊ लागला आहे. मंदौस चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस पडला तर काजू हातचा जाईल. हे वादळ किनाऱ्यावर धडकताना तीव्रता वाढली तर ते अडचणीचे होईल.

संजय दामले, शेतकरी अभ्यासक