तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता; सत्तेसाठी काँग्रेसची मदत घेणार- केसीआर

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मात्र आज वेगळाच सूर आळवला. आमची आघाडी सरकार स्थापनेसाठी राहुल यांची मदत घेण्यास तयार आहे, पण चालकाची जागा मात्र कॉंग्रेसकडे नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मात्र आज वेगळाच सूर आळवला. आमची आघाडी सरकार स्थापनेसाठी राहुल यांची मदत घेण्यास तयार आहे, पण चालकाची जागा मात्र कॉंग्रेसकडे नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांची बाजू घेतली. चालकाची जागा ही प्रादेशिक पक्षांनाच मिळायला हवी. "फेडरल फ्रंट'चा घटक असणाऱ्या एखाद्या प्रादेशिक पक्षालाच पंतप्रधानपद मिळायला हवे, आम्हाला भाजपशी काहीही देणेघेणे नाही, आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही अथवा त्यांचा पाठिंबा घेणारही नाही, असे के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी राव यांनी सोमवारी "द्रमुक'चे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांची भेट घेतली होती. या भेटीवर भाष्य करताना स्टॅलिन यांनी मात्र लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसेतर आणि भाजपेतर पक्षांच्या तिसऱ्या आघाडीला फारसे भवितव्य राहणार नाही, असे नमूद केले; पण अंतिम निर्णय मात्र 23 मेनंतरच घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले. चंद्रशेखर राव तमिळनाडूमध्ये आघाडीची बोलणी करायला आले नव्हते, ते येथे मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी आले होते, त्यांच्या विनंतीनंतरच आमची भेट झाली, असेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे "द्रमुक'चे खजिनदार आणि ज्येष्ठ नेते दुराई मुरूगन यांनीही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची आज गोपनीय भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

संख्याबळच पंतप्रधान ठरवेल 
हल्दिया (पश्‍चिम बंगाल) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एक चांगले नेते असून, ते नेहमीच देशाचा विचार करतात. केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भाजपेतर पक्षांनी 1996 मध्ये आघाडी सरकारमधून कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची जी चूक केली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे प्रतिपादन तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. भाजपेतर पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवारदेखील त्या त्या पक्षांच्या खासदारांची संख्या पाहूनच ठरविला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Federal front open to take Rahuls support to form govt says KCR