डेबिट कार्डवरील शुल्क माफ

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

डेबिट कार्डवरील व्यवहार शुल्क बॅंकांनी रद्द केले आहे. कार्ड कंपन्यांनीही सेवा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारावर शुल्क आकारले जाणार नाही.
- शक्तिकांत दास, आर्थिक कामकाज सचिव

व्यवहारासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाहीत; 31 डिसेंबरपर्यंत सवलत
नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सकारने सर्व डेबिट कार्डवरील व्यवहार शुल्क 31 डिसेंबरपर्यंत माफ केले आहे.

याविषयी माहिती देताना आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास म्हणाले, 'सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंका आणि खासगी क्षेत्रातील काही बॅंका डेबिट कार्डने होणाऱ्या व्यवहारावरील शुल्क माफ करण्यास तयार झाल्या आहेत.

यासह सेवा पुरवठारदार कंपन्यांही सेवांवरील शुल्क माफ करण्यास तयार झाल्या आहेत. सध्या रुपे डेबिट कार्डवरील व्यवहार शुल्क रद्द करण्यात आले आहे. मास्टर कार्ड आणि व्हिसा यासारख्या अन्य आंतरराष्ट्रीय कंपन्या सध्या व्यवहार शुल्क आकारत आहेत. डेबिट कार्डवरील प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना शुल्क आकारून कंपन्या ते सरकारला देतात.''

डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर 0.75 टक्का शुल्क, तर दोन हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहारावर एक टक्का शुल्क आकारण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने घालून दिली आहे. मात्र क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारावर शुल्काची मर्यादा नाही.

Web Title: fee waived on debit card