अभिनेत्री अडकली हिमाचलच्या पुरात

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

उत्तर भारतात पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थानातील अनेक भागात पूरस्थिती आहे. विशेषत: हिमाचलमध्ये पावसामुळे दरड कोसळल्याने लेह-मनाली रस्ता बंद केला आहे.

तिरुअनंतपुरम / सिमला : उत्तर भारतात पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थानातील अनेक भागात पूरस्थिती आहे. विशेषत: हिमाचलमध्ये पावसामुळे दरड कोसळल्याने लेह-मनाली रस्ता बंद केला आहे. दरम्यान, हिमाचलच्या दुर्गम खेड्यात शुटिंगसाठी आलेली मल्याळम अभिनेत्री मंजूर वारियरसह तीस जणांची टीम गेल्या काही दिवसांपासून पावसात अडकून पडली आहे. 

मंजू वारियर, दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन आणि चित्रपटातील सहायक मंडळी हे हिमाचलच्या मनालीपासून 80 किलोमीटर अंतरावरील छत्र येथे पुरात अडकले आहेत. काल रात्री अभिनेत्री मंजूने भावाला सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून मदतीची मागणी केली आहे. या गावात या टीमसह सुमारे 200 हून नागरिक अडकले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. त्यांच्याकडे एक-दोन दिवसांचे जेवण शिल्लक आहे. पूर असल्यामुळे मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मंजू वारियरचे बंधू मधू यांनी राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना मदतीसाठी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर मनाली आणि लेह यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा आज सकाळी बंद करण्यात आला.

रोहतांगजवळ दरड कोसळल्याने वाहतूक कोलमडून पडली. दरड बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या काही तासांत रस्ता सुरू होण्याची चिन्हे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film Star Manju Warrier Crew Stuck In Himachal Floods