'अम्मा' अखेरच्या विसावल्या...

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

लाडक्या अम्मांना निरोप देण्यासाठी तमिळनाडूच्या विविध भागांमधून आलेले लाखो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तमिळी रिवाजानुसार जयललिता यांचा संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी दफनविधी करण्यात आला.

चेन्नई- तमिळ जनतेच्या लाडक्‍या "अम्मा' व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता जयरामन ऊर्फ जे. जयललिता (वय 68) यांच्यावर शोकाकूल वातावरणात आज (मंगळवार) मरीना बीचवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तमिळनाडूच्या जनतेला अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी राजाजी हॉलमध्ये जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. लाखोंच्या संख्येने लोटलेल्या जनसागरासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जयललितांचे अंत्यदर्शन घेतले. फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये जयललिता यांचे पार्थिव ठेवले होते. लाडक्या अम्मांना निरोप देण्यासाठी तमिळनाडूच्या विविध भागांमधून आलेले लाखो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. जयललितांच्या निधनामुळे छत्र हरपल्याने अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. तमिळी रिवाजानुसार जयललिता यांचा संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी दफनविधी करण्यात आला.

जयललिता यांचे सोमवारी (ता. 5) रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. त्याआधी 74 दिवस त्यांची अपोलो रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. तीन दशके त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणावर अधिराज्य गाजविले. देशाच्या राजकारणातही त्यांनी तितक्‍याच ताकदीने छाप उमटविली. गरीब जनतेसाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे "अम्मा' सामान्य नागरिकांत अफाट लोकप्रिय ठरल्या.

एम. जी. रामचंद्रन यांचे बोट धरून 80 च्या दशकात राजकारणात पाऊल ठेवलेल्या जयललिता यांनी पुढे राज्याच्या राजकारणात इतिहास घडविला. स्वतःच्या मर्जीप्रमाणे राजकारण करीत त्यांनी तमिळनाडूच्या जनतेच्या मनावर गारुड केले. ताप आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्यांना 22 सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली.

Web Title: final rites Jaylalita