शबरीमला मंदिरात दोन महिलांचा अखेर प्रवेश

शबरीमला मंदिरात दोन महिलांचा अखेर प्रवेश

शबरीमला : केरळच्या शबरीमला येथील अयप्पा मंदिरात आज 44 वर्षीय आणि 42 वर्षीय दोन महिलांनी इतिहास घडवत प्रवेश केला. या घटनेला मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, मंदिरात महिलांच्या प्रवेशानंतर मुख्य पुजाऱ्यांनी शुद्धिकरणासाठी मंदिराचे गर्भगृह बंद करण्याचा निर्णय घेतला. 

शबरीमला मंदिर आज पहाटे तीनच्या सुमारास उघडण्यात आले होते. मात्र शुद्धिकरणासाठी सकाळी दहा वाजता बंद करण्यात आले. साधारणपणे मंदिर 12च्या सुमारास बंद करण्यात येते. मात्र दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर शुद्धिकरणासाठी भाविकांना मंदिराबाहेर जाण्याची सूचना मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली. शुद्धिकरणानंतर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. 

सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी दहा ते 50 वयोगटांतील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला होता. असे असतानाही या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. यादरम्यान, माकपचे राज्य सचिव कोडियेरी बालाकृष्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचे सांगितले. मंदिर बंद करणे हे न्यायालयाच्या निर्णयाविरोधात असल्याचेही ते म्हणाले. लोकांनी हा बदल स्वीकारायला हवा, असेही ते म्हणाले. 

असा प्रवेश केला 

पारंपरिक काळ्या रंगाचा पेहराव केलेल्या आणि डोक्‍यावरून पदर घेतलेल्या कनकदुर्गा (वय 44) आणि बिंदू (वय 42) यांनी बुधवारी पहाटे तीन वाजून 38 मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला. उपस्थित भाविकांचा होणारा विरोध लक्षात घेता दोन्ही महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यापूर्वीही 24 डिसेंबरला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला गेला होता,

मात्र विरोधांमुळे महिलांना माघारी फिरावे लागले. बिंदू या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि भाकपच्या कार्यकर्त्या आहेत. त्या कोझिकोड जिल्ह्यातील कोयिलॅंडीच्या रहिवासी होत. तर कनकदुर्गा या मलप्पूरमच्या अंगदीपूरममध्ये कर्मचारी आहे. त्या दोघी 24 डिसेंबरला शबरीमला येथे आल्या होत्या. तत्पूर्वी चेन्नईच्या एका संघटनेने 11 महिलांना प्रवेश करण्यापासून रोखले होते. 

प्रत्येक महिलेला इच्छेप्रमाणे प्रार्थना आणि पूजा करण्याचा अधिकार आहे. या दोन महिलांनी पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गरजेनुसार केरळ सरकारने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली. 

- वृंदा कारत, सीपीआय(एम) ज्येष्ठ नेत्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com