देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकेकाळी परदेशात केलं होतं सेल्स गर्लचं काम

सुशांत जाधव
Tuesday, 18 August 2020

निर्मला सीतरामण यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणात पाउल ठेवणाऱ्या त्या कुटुंबातील एकमेव सदस्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्रात संरक्षण मंत्र्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या निर्मला सीतारामण सध्याच्या घडीला देशाच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. 18 ऑगस्ट 1959 मध्ये तमिळनाडूतील मदुरै याठिकाणी निर्मला सीतारामण यांचा जन्म झाला. त्यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांचे वडील नारायण सीतारमण रेल्वेमध्ये नोकरीला होते. तर आई सावित्री या हाउसवाइफ होत्या. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता यासंदर्भातील माहिती... 

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे सुरुवातीचे शिक्षण तमिळनाडू येथील तिरचिरापल्ली येथे झाले. त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटी, दिल्ली (JNU) याठिकाणी त्यांनी उच्चशिक्षणाला प्रवेश घेतला. पदवीत्तोर शिक्षणासह त्यांनी याच ठिकाणी  एम फिलचे शिक्षण पूर्ण केले. जेएनयूमध्ये निर्मला सीतारामण आणि डॉ. परकाला प्रभाकर यांची भेट झाली. पुढे जाऊन दोघांनी विवाह केला. त्यांना एक मुलगी देखील आहे. 

फेसबुक-भाजप युतीच्या गौप्यस्फोटाची संसदीय चौकशी करा; काँग्रेसची मागणी

विवाहानंतर गाठले लंडन

डॉ. परकाला प्रभाकर  यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्या लंडनला गेल्या. ज्यावेळी त्या परदेशात गेल्या त्यावेळी घर सजावटीचे साहित्य विक्रीच्या एका दुकानात त्यांनी सेल्स गर्ल म्हणून काम केले. त्यानंतर लंडनमधील कृषी इंजिनियर्स असोसिएशन आणि त्यानंतर प्राइज वॉटरहाऊसमध्ये सीनियर मॅनेजर पदावर काम केले. परदेशातून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी  हैदराबादमधील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी या संस्थेत संचालक बॉडीतही चांगल्या पदावर काम केले.  

2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश 

निर्मला सीतरामण यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणात पाउल ठेवणाऱ्या त्या कुटुंबातील एकमेव सदस्या आहेत. अर्थशास्त्रातील पदवी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व याच्या जोरावर त्यांनी पक्षात एक वेगळी ओळख निर्माण केली. सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपची बाजू मांडण्याची क्षमता असणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. वादग्रस्त वक्तव्यापासून दूर राहणाऱ्या निर्मला सीतारामण या पंतप्रधान मोदींच्या भरवशातील नेत्यांपैकी एक असल्याचे मानले जाते.   

काय सांगता! वुहान शहरातील वॉटर पार्कमध्ये हजारो चिनी नागरिकांची पार्टी

संरक्षण ते अर्थमंत्री पदाची जबाबदारी  

2010-14 मध्ये राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून भूमिका बजावल्यानंतर निर्मला सीतारामण यांच्यासाठी मंत्रालयाचे दरवाजे हळूहळू खुले झाले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) या पदावर काम केल्यानंतर राज्यसभेच्या सदस्य असलेल्या निर्मला सीतारामण यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.  राफेलप्रकरणात विरोधकांच्या आरोपाला त्यांनी चोखप्रत्युत्तर देत सक्षम भूमिका निभावली. त्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या अर्थमंत्रीपदी नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance minister nirmala sitaraman birthday You know she worked as a salesgirl At Landon