वनवास संपविण्यासाठी ट्विट अन् भडकल्या सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या स्मित राज या व्यक्तीने सुषमा स्वराज यांना टॅग करत म्हटले की, भारतात तुम्हा आमचा वनवास संपवू शकता का? माझी पत्नी झांशीमध्ये रेल्वेत नोकरी करते आणि मी पुण्यात आहे.

नवी दिल्ली - ट्विटरवर मदत मागणाऱ्यांना सतत मदतीसाठी तयार असणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना चक्क एका नागरिकाने पत्नीच्या बदलीसाठी ट्विट केल्याने त्या भडकल्या. 

घटना अशी की, पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या स्मित राज या व्यक्तीने सुषमा स्वराज यांना टॅग करत म्हटले की, भारतात तुम्हा आमचा वनवास संपवू शकता का? माझी पत्नी झांशीमध्ये रेल्वेत नोकरी करते आणि मी पुण्यात आहे.

या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, तुम्ही आणि तुमची पत्नी माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीस असता आणि ट्विटरवरून तुम्ही बदलीची मागणी केली असती. तर, तात्काळ मी तुमच्या निलंबनाची नोटीस पाठविली असती. मात्र, राग येऊनही त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या बदलीबाबत ट्विट पाठविले. यावर प्रभू यांनी रेल्वे बोर्डाला याबाबत लक्ष देण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.

सुषमा स्वराज यांनी परदेशातील नागरिकांना अडचणीत असल्यास मदतीसाठी ट्विटरवरून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परदेशात अडचणीत असलेल्या नागरिकाने आपली अडचण भारतीय राजदूतापर्यंत ट्विट करून पोहचवावी. तसेच या ट्विटमध्ये @sushmaswaraj असे टॅग करावे. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या त्या घडामोडीवर लक्ष ठेवू शकेल. तसेच नागरिकांना SOS हा हॅशटॅगही वापरावा. 

स्वराज यांनी आतापर्यंत अनेकवेळा परदेशात अडकलेल्या नागरिकांची मदत केली आहे. टोरंटो येथे अडचणीत असलेल्या अरुण जनार्दन या भारतीय नागरिकाने ट्विटरवरूनच सुषमा यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर सुषमा यांनी सर्व सुत्रे हलवत त्याला मदत केली होती.

Web Title: for first time sushma swaraj loses her cool on this request by a husband