अमेरिकेनं 100 वर्षांपूर्वी केलं ते भारत आता करतोय, टॉय फेअर म्हणजे काय?

टीम ई सकाळ
Saturday, 27 February 2021

देशातील पहिल्या ऑनलाइन टॉय फेअरचे टायटल स्पॉन्सर रिलायन्स रिटेलची मालकी असलेली सर्वात जुनी ब्रिटिश बहुराष्ट्रीय खेळण्याची कंपनी हॅमलेज ही आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भरचा नारा देताना देशी खेळण्यांना प्रोत्साहन मिलावं यासाठी मोठी घोषणा केली. त्यांनी देशात पहिल्यांदाच होत असलेल्या खेळण्याच्या जत्रेचं उद्घाटन केलं. यावेळी देशाला खेळण्यांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनवा असं आवाहन केलं. मोदी म्हणाले की, भारतीय खेळणी हा इथल्या जीवनसशैलीचा भाग असलेल्या रियूज, रिसायकल संस्कृतीचा वापर करतात. तसंच उत्पादकांना कमी प्लास्टिक आणि पुर्नवापर होइल असं साहित्य वापरावं असेही सांगितले. 

देशी खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावं यासाठी संधी असायला हवी. यामधूनच खेळण्यांची जत्रा भरवण्याची कल्पना समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी खेळण्यांच्या जत्रेचं व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी देशातील टॉय क्लस्टरशी संवाद साधला. कर्नाटकात 200 वर्षांपासून खेळण्याचे क्लस्टर बनवले जातात. खेळणी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणा असं मोदींनी आवाहन यावेळी केलं. 

हे वाचा - पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपची 'पावरी', जेपी नड्डांचा व्हीडिओ व्हायरल

मोदी म्हणाले की, 100 अब्ज डॉलरच्या खेळणी उद्योगात भारताचा वाटा अल्प असल्याने आपल्याला 85 टक्के खेळणी आयात करावी लागतात. हे बदलण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे. भारतात हातांनी बनविलेल्या खेळण्यांना देशवासीयांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. अस्सल भारतीय, पर्यावरण पूरक व आकर्षक आणि अभिनव खेळणी उत्पादनाकडे भारतीय उद्योजकांनी लक्ष दिले पाहिजे. हाताने बनविलेल्या खेळण्यांना अधिकाधिक बाजारपेठ मिळाली पाहिजे. 

पंतप्रधान म्हणाले, की भारताच्या खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने याचा समावेश 24 प्रमुख उद्योगांत केला असून 15 मंत्रालयाचा सहभाग असलेली राष्ट्रीय खेळणी कार्य योजना बनविली आहे. मुले जे पाहतात त्याचे अनुकरण करतात. सध्याच्या कोरोना काळात मुलांना वाटत असेल की खेळण्यातील बाहुला-बाहुलीलाही मास्क पाहिजे. बुद्धिबळ नावाने जो खेळ जगात प्रसिद्ध आहे तो भारतात प्राचीन काळी चतुंग किंवा चादुरंगा नावाने खेळला जात होता. आधुनिक लूडो आमच्याकडे पच्चीसी म्हणून प्रसिद्ध होता. राम बाल्यावस्थेत असताना कितीतरी विविध खेळण्यांबरोबर खेळायचा त्याचे वर्णन रामायणात आले आहे. जोपर्यंत आम्ही नवनवीन पद्धती, नवनवीन प्रयोग करत नाही तोपर्यंत आम्ही जगाच्या गरजा पुरविण्यासाठी सक्षम होऊ शकत नाही. 

हे वाचा - दोन व्यक्ती करताहेत पंतप्रधानांचा वापर, काम झाल्यावर देतील फेकून - राहुल गांधी

अमेरिकेत 100 वर्षांपूर्वी टॉय फेअर
भारतातील पहिल्या टॉय फेअरची सुरुवात 27 फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. पण अमेरिकेत याच टॉय फेअरची सुरुवात 100 वर्षांपूर्वी झाली होती. अमेरिकेत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टॉय फेअर 1903 मध्ये झाले होते. याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं होतं आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये टॉय फेअर सुरु केले. यावेळी अमेरिकेच्या इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये डिजनीने डिजनी ज्यूनिअरवर 130 पेक्षा जास्त खेळण्यांचं अनावरण केलं होतं. 

हे वाचा - खासगी रुग्णालयांमध्ये मिळू शकणार २५० रुपयांत करोना प्रतिबंधक लस

हॅमेलज टाटयल स्पॉन्सर
देशातील पहिल्या ऑनलाइन टॉय फेअरचे टायटल स्पॉन्सर रिलायन्स रिटेलची मालकी असलेली सर्वात जुनी ब्रिटिश बहुराष्ट्रीय खेळण्याची कंपनी हॅमलेज ही आहे. जत्रेमध्ये कंपनी त्यांचा व्हर्च्युअल बूथ स्थापन करणार आहे. टॉय फेअरमध्ये 1 हजारांहून अधिक स्टॉलसह एक व्हर्च्युअल प्रदर्शनसुद्धा असणार आहे. तसंच सोबत पॅनेल चर्चा आणि वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केलं जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first toy fair in india 2021 know about history