माशांत फॉर्मेडिहाईड नैसर्गिकरित्याच : मनोहर पर्रीकर

अवित बगळे
सोमवार, 23 जुलै 2018

माशांवर फॉर्मलीनचा वापर होत असल्याबाबत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता.

पणजी - सागरी माशांत फॉर्मेडिहाईड नैसर्गिकरीत्या असते. भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाचे हे म्हणणे आहे. केवळ माशांतच नव्हे तर फळे व भाज्यांतही असते. मात्र हे अन्न गरम केल्यावर म्हणजे ७० अंश तापमान झाल्यावर त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे ते मानवी शरीरात प्रवेश करत नाही आणि ते हानीकारक ठरत नाही असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज गोवा विधानसभेत सांगितले.

माशांवर फॉर्मलीनचा वापर होत असल्याबाबत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. त्या सुचनेवर सव्वा दोन तास चर्चा झाली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, प्राधिकरणाचे म्हणणे या विषयांत अंतिम आहे. त्याचा अहवाल मी सभागृहात सादर करतो. सागरी माशांत फॉर्मेडिहाईडचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे किलोमागे केवळ ५ ते १४० मिलीग्रॅम असते. मांसात ते ५ ते २० मिलीग्रॅम, फळ व भाज्यांत किलोमागे २० ते ६० मिलीग्रॅम प्रत्येक किलोमागे असते. शिंपल्यांत त्याचप्रमाण किलोमागे ४ मिलीग्रॅम आहे. गोड्या पाण्यातील माशांत ते नसते. मात्र या विषयावरून लोकांत घबराट परसल्याने सरकारने बाहेरून आणण्यात येणाऱ्या माशांवर बंदी घातली आहे. 

गोव्यात मासेमारी होते मात्र एकाच प्रकारचे मासे बऱ्याचदा मिळते. हॉटेलांत सर्व प्रकारची मासळी लागते. त्यासाठी बाहेरून मासे आणावे लागते. त्याला मासे बाजारात विकण्यासाठी येताना त्याचा नमूना तपासला जाणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीवर संशय घेतला जाऊ नये. बाहेरून मासे न आणल्यास येथील माशांचे दर वाढतील आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. मासे विक्रीत मक्तेदारी नको, त्याची काळजी घ्यावी. हा विषय फार ताणून गोव्याची प्रतिमा खराब करू नये. मासेमारी बंदीच्या काळात, डिसेंबर जानेवारी तसेच एप्रिल-मे महिन्यात माशांची मागणी वाढते. त्याकाळात तपासणीचे प्रमाण वाढवले पाहिजे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fish Formidehyde Naturally says Manohar Parrikar