महाराष्ट्र, कर्नाटकातून मासळीची आयात गोव्यात सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मडगाव  : गोव्याच्या सीमेपासून 60 किलोमीटरपर्यंतच्या मच्छिमारांना गोव्यात मासळी पाठवण्याची मुभा देण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या निर्णयाचे मडगाव घाऊक मासळी विक्रेता संघटनेने स्वागत केले असून, 6 डिसेंबरपासून महाराष्ट्र व कर्नाटकातून मासळी आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राणे यांच्या निर्णयाचे संघटना स्वागत करत आहे. गेले काही महिने थंडावलेला मासळी व्यवसाय या निर्णयामुळे पुन्हा सुरू होणार आहेत. 6 डिसेंबरपासून मासळीची आयात पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहे, असे मडगाव घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मुसा यांनी सांगितले. इतर राज्यांतून मासळीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची  नोंदणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे अर्ज करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

फॉर्मेलीन प्रकरणानंतर एफडीएने मासळीची आयात व विक्रीसाठी निर्बंध लागू केले होते. इन्सुलेटेड वाहनातून मासळीची आयात, वाहनांची एफडीएकडे नोंदणी, घाऊक मासळी विक्रेत्यांसाठी पालिकेचा व्यापार परवाना सक्तीचा, असे निर्बंध एफडीएने जाहीर केले होते. या नियमांचे पालन न झाल्याने एफडीएकडून मासळी व्यावसायिकांवर कारवाई झाली होती. त्यामुळे मासळी व्यवसाय गेले चार महिने ठप्प झाला आहे. मासेप्रेमींसह, हॉटेल व्यावसायिक व एकूणच पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. 

गोव्यात मासळीची आयात बंद झाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील मासळी व्यवसायावर परिणाम झाला होता. मासळीची आयात बंद झाल्यानंतर गेला महिनाभर मडगाव घाऊक मार्केटात दरदिवशी सुमारे 10 टन स्थानिक मासळी येत आहे. एरवी हंगामात दरदिवशी या मार्केटमध्ये सरासरी 65 टन मासळीची आवक होते.

Web Title: Fishery Imports from Maharashtra and Karnataka will start in Goa