पाचशे, दोन हजारांच्या बारा लाख नव्या नोटा- जेटली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मार्च 2017

लोकसभेत अर्थमंत्री जेटली यांची माहिती

लोकसभेत अर्थमंत्री जेटली यांची माहिती

नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या 12 लाख नव्या नोटा आणल्या आहेत, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली. नोटाबंदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या नोटा चलनात आणण्यासाठीचा नेमका खर्च कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल जेटली यांनी नोटाबंदीनंतर बाजारात आलेल्या चलनाची माहिती देताना सांगितले, की 24 फेब्रुवारीपर्यंत 11 लाख 64 हजार 500 नव्या नोटांचे वितरण झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली होती. या माहितीनंतर जवळपास पंधरवडा झाला असल्याने नव्या नोटांची संख्या बारा लाखांपर्यंत पोचली आहे.

गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना जेटली म्हणाले, की आतापर्यंत व्यवहाराच्या बाहेर असलेल्या सर्व बेहिशेबी नोटा पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेमध्ये परत आल्या आहेत. ही रक्कम काळापैसा आहे की नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी जमाकर्त्यांवर आहे; मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर रद्दबातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा किती परत आल्या हे सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. ते म्हणाले, की जमा झालेल्या जुन्या नोटांचा एकत्रित आकडा लगेच सांगणे अशक्‍य आहे. जमा झालेल्या नोटा खऱ्या असोत किंवा बनावट असोत, प्रत्येक नोटेची तपासणी होणे आवश्‍यक आहे. सर्व नोटा तपासून खऱ्या नोटा आणि बनावट नोटा वेगवेगळ्या काढणे हे प्रचंड मोठे काम आहे. रिझर्व्ह बॅंकेने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोटांचा तपशील संसदेसमोर जाहीर केला जाईल, असेही जेटली म्हणाले.

"संपत्ती जप्तीचा कायदा लवकरच'
आर्थिक गुन्हे करून परदेशात पळून जाणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा कायदा लवकरच आणला जाणार आहे. यासंदर्भातील सध्या असलेल्या सर्व कायद्यांमध्ये बदलाची आवश्‍यकता किंवा नव्या कायद्यासाठी सरकारतर्फे कायद्यांचा आढावा घेतला जात आहे, अशीही माहिती जेटली यांनी दिली. अर्थसंकल्पी भाषणात जेटली यांनी या कायद्याचे सूतोवाच केले होते.

Web Title: Five hundred, two thousand twelve million new note- Jaitley