esakal | पंजाबमध्ये पाच घुसखोर ठार; पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात येण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

border-security.jpg

पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील ढल या भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय निरीक्षण ठाणे (बीपीओ) आहे. तेथून पाच जण काल रात्री भारतात घुसण्याचा प्रत्यय करीत होते.

पंजाबमध्ये पाच घुसखोर ठार; पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात येण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अमृतसर- पंजाबमधील भारत -पाकिस्तान सीमेवरून शुक्रवारी (ता.२१) रात्री उशिरा भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न उधळून लावत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाच घुसखोरांचा खातमा केला. त्यांची झडती घेतली असता अमली पदार्थ व शस्त्रे जप्त करण्यात आली.

पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील ढल या भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय निरीक्षण ठाणे (बीपीओ) आहे. तेथून पाच जण काल रात्री भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी ठाण्यावर तैनात असलेल्या ‘बीएसएफ’च्या १०३ व्या बटालियनच्या जवानांनी घुसखोरांच्या पावलांचा आवाज ऐकला व त्यांनी तेथेच थांबण्याचा इशारा दिला. पण त्याकडे दुर्लक्ष करत घुसखोरांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात पाचही घुसखोर ठार झाले. यानंतर सर्व परिसर सील करून शोध मोहीम सुरू केली. त्यात आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास काटेरी तारेच्या कुंपणाजवळ तीन मृतदेह आढळले. तेथून थोड्या अंतरावर आणखी दोन घुसखोरांचे मृतदेह सापडले, अशी माहिती ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी दिली. हे घुसखोर सरकंदा नावाच्या उंच गवतात लपत भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. ठार झालेल्या घुसखोरांकडून अमली पदार्थ, एक एके ४७ रायफल व दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना

आंतरराष्ट्रीय तस्करांचे हस्तक

हे घुसखोर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय तस्करांचे हस्तक असल्याचे सांगितले जात आहे. घुसखोरीची माहिती मिळाल्यावर ‘बीएसएफ’चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले. पंजाबमधून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांना एवढ्या मोठ्या संख्येने ठार करण्याची दशकातील ही पहिलीच घटना आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.