बेळगाव : महापुराचा सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यावसायिकांना

बेळगाव : महापुराचा सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यावसायिकांना

बेळगाव - येथे आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यावसायिकांना बसला आहे. यंत्रमाग पुराच्या पाण्याने भिजल्याने खराब झाले आहेत. तयार साड्या, कच्चा माल आणि इतर साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. 

पुरामुळे घर सोडून निवारा केंद्रात आसरा घेतलेले विणकर घरी परतू लागले आहेत. मात्र, यंत्रमागांची झालेली स्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आहेत. शहराच्या विविध भागातील 2,000 तर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार यंत्रमाग कामगारांना महापुराचा फटका बसला आहे. 

शहरात वडगाव, खासबाग भागात विणकर समाजाची संख्या अधिक आहे. या भागातील अनेकजण यंत्रमागावर साड्या तयार करण्याचे काम करतात. येथील यंत्रमाग व्यावसायिकांकडे काम करण्यासाठी कामगारही अधिक आहेत. मात्र, वीस दिवसांपासून विणकरांची वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या साईनगर, मलप्रभानगर, सुणगार मळा, शांती कॉलनी, कल्याणनगर येथील यंत्रमाग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

पावसाची संततधार सुरु झाल्यानंतर अनेक भागात पुराचे पाणी शिरले. साईनगर आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील नागरिकांना तातडीने महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरीत केले होते. 

पावसाचा जोर ओसरल्यानंतर निवारा केंद्रात राहणारे नागरिक घरी परत येऊ लागले आहेत. परंतु, यंत्रमाग आणि घराची झालेली अवस्था पाहून अनेकजण चिंतातूर झाले आहेत. साहित्याचे झालेले नुकसान आणि ठप्प झालेला व्यवसाय यामुळे जगायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

साईनगर, मलप्रभानगर येथील यंत्रमागात पाणी आणि कचरा साचला आहे. तसेच आठ ते दहा दिवस मशिनी पाण्यात असल्याने मोटारी खराब झाल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे दुरुस्ती करुनच यंत्रमाग सुरु करावे लागणार आहेत. यासाठी आता राज्य सरकारनेच विणकरांसाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी आहे. 

यंत्रमाग कामगार आणि व्यावसायिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. पावसामुळे यंत्रमाग खराब होण्याबरोबरच अनेकांची घरे पडली आहेत. यंत्रमागांवर काम करणाऱ्या कामगारांना आठवड्याचा पगार मिळतो. यावर त्यांचे कुटुंबीय अवलंबून असतात. मात्र, मार्ग बंद असल्यामुळे पगाराअभावी कामगार संकटात आहेत. 
- गजानन गुंजेरी,
यंत्रमाग व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com