बिहारमधील पूरस्थिती गंभीर

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पाटणा - बिहार आणि नेपाळमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सहाहून अधिक जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पुरामुळे आतापर्यंत 11 जण मृत्युमुखी पडले असून वीस जण अद्याप बेपत्ता आहेत. पूर्णिया, कटिहार, अररिया, किशनगंज, सुपौल आणि पश्‍चिम चंपारणमध्ये पुराने गंभीर पातळी गाठली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा केला असून, घटनास्थळी वेगाने मदतकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारच्या सीमांचल जिल्ह्याचे हवाई पाहणी केली. राज्यातील पूरस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना फोनवरून दिली. दोन्ही नेत्यांनी मदतीबाबत कोणतीही उणीव राहणार नाही, याबाबत आश्‍वासन दिले आहे. एनडीआरएफचे सुमारे साडेतीनशे जवान पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आले आहेत.

नीतीशकुमार म्हणाले की, पूरग्रस्त भागात मदतकार्याला प्रारंभ झाला असून, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. आपत्कालीन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत म्हणाले की, किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहारशिवाय बेतिया, मोतिहारी येथील भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. बिहार रेजिमेंटच्या 80 जवानांबरोबरच एसडीआरएफची टीम मदतकार्यात सहभागी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी दिले जाणारे खाद्यान्न पूर्णियापर्यंत पोचले आहे. जिल्हाधिकारी प्रदीप कुमार झा यांच्या मते, सध्या जेवणाची 50 हजार पाकिटे तयार असून, त्याचे वितरण सुरू आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगाने सुरू असून छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी भोजन आणि आरोग्यतपासणी शिबिराची व्यवस्था करण्यात आली आहे.

आसाम पूरस्थितीचा मोदींकडून आढावा
आसाममधील पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली आणि राज्याला सर्वोपतरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. मोदी यांनी कालही सोनोवाल यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमध्येही पुरामुळे अनेक गावांना फटका बसला असून रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, आसाम राज्यातील अनेक भागात पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आसामला संपूर्ण सहकार्य आणि मदत दिली जाईल. आसामच्या अधिकाऱ्यांच्या मते, आसाममध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन कोलमडून पडले असून, पुरामुळे किमान 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील 22 जिल्ह्यांतील 22 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग 37 वर वाहतूक ठप्प असून, हा महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधानाचे सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी आसामच्या मुख्य सचिवांना राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन अहवाल पाठवण्याचे सांगितले आहे.

Web Title: flood in bihar