गुजरातमध्ये अतिवृष्टी; मृतांचा आकडा 123 वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगात सुरू आहे. बनासकांठा येथे पुरामुळे एकाच कुटुंबातील चौदा जणांसह 29 जणांचा मृत्यू झाला आहे

अहमदाबाद - गुजरात, राजस्थान आणि पश्‍चिम बंगालसह देशातील अनेक भागांत पावसाने गेल्या चोवीस तासांत जोरदार हजेरी लावली. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये गेल्या चोवीस तासांत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले आहे. तसेच, गांधीनगर परिसरात अतिवृष्टी झाली असून, चोवीस तासांत तीनशेहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अहमदाबाद शहरातील जनजीवन संपूर्णपणे कोलमडून पडले असून, शाळा- कॉलेज, खासगी क्‍लासेसना सुटी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक ठप्प पडली असून, सरकारी कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. रस्त्यावरच पाणी साचल्यामुळे चारचाकी, दुचाकी गाड्या निम्म्या पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्यातील पावसाच्या बळींची संख्या 123 वर पोचली आहे. गांधीनगरच्या कालोल तहसीलअंतर्गत चोवीस तासांत 370 मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यात आज सकाळी अवघ्या चार तासांत पडलेल्या तब्बल 240 मिलिमीटर पावसाचा समावेश आहे.

अहमदाबाद शहरात पाण्याची पातळी एवढ्या प्रमाणात वाढली, की घर, दुकाने, मंदिरांसह सर्व सखल भागांत पाणी शिरले. संपूर्ण शहर जलमय झाले असून, रस्त्यावरून वाहने कशीबशी मार्ग काढत जात असल्याचे चित्र आहे. अहमदाबाद येथे काल रात्रीपासून जोरात पाऊस पडत असून, गेल्या चोवीस तासांत सुमारे 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रस्त्यावर वाहने उभी असून, घरासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. दूध, भाजीपाला आणण्यासाठी नागरिकांना बरीच कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगात सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि दंतेवाडा आणि सिपू धरणातून काही दिवसांपूर्वी बनास व सिपू नदीचे पाणी सोडल्यामुळे बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील अनेक खेड्यांत पूर आला आहे. बनासकांठा येथे पुरामुळे एकाच कुटुंबातील चौदा जणांसह 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: flood in Gujarat claims at least 123 lives