बिहार, ईशान्य भारतात पावसाचा जोरदार मारा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने 'बिहारचे अश्रू'चे समजल्या जाणाऱ्या कोसी नदीला पूर आला आहे. कोसीची पातळी वाढत असल्याने बिहार-नेपाळ सीमेवरील वीरपूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येऊन 3.9 लाख क्‍युसेक, तर गंडक बंधाऱ्यातून दोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.

पाटणा : काही दिवसांपूर्वीच उष्माघाताने हैराण झालेल्या बिहारला आता पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. राज्याच्या उत्तर भागात पुराच्या पाण्याने जनजीवन ठप्प झाले असून, आतापर्यंत पुरात बुडून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम, त्रिपुरासह ईशान्य भारतातही पाऊस कोसळत आहे. 
बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने 'बिहारचे अश्रू'चे समजल्या जाणाऱ्या कोसी नदीला पूर आला आहे. कोसीची पातळी वाढत असल्याने बिहार-नेपाळ सीमेवरील वीरपूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येऊन 3.9 लाख क्‍युसेक, तर गंडक बंधाऱ्यातून दोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. सीतामढी, अररिया आणि किशनगंज या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 11 पथके बिहारमध्ये पाठविण्यात आली आहेत. 

दुसरीकडे आसाममध्ये मुसळधार पावसामुळे किमान दहा लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घ्यावा लागला आहे. पावसामुळे गेल्या तीन दिवसांत येथे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच विशाल असलेल्या ब्रह्मपुत्रेने किनाऱ्याची बंधने केव्हाच झुगारून दिल्याने 1800 गावांचा संपर्क तुटला आहे. आगामी काही दिवसांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods Wreak Havoc in Six Bihar Districts