काँग्रेस आमदार फिरोज सेठ यांच्या पदयात्रेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार फिरोज सेठ यांच्या पदयात्रेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार सेठ अडचणीत आले आहेत.

बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार फिरोज सेठ यांच्या पदयात्रेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आमदार सेठ अडचणीत आले आहेत.

याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी (ता.9) सेठ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन तो व्हिडिओ बोगस असल्याचा दावा केला. केवळ एका विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी संपूर्ण देशात विद्वेषाचा वणवा पेटविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यानी केला. याप्रकरणी भाजप नेत्यांच्या विरोधात सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदविणार असल्याचे त्यानी सांगितले. संबंधित सर्वाना यावेळी कारागृहात पाठविणारच असे ते म्हणाले.

दरम्यान, सेठ यांच्या प्रचारफेरीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. बुधवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यानी यासंदर्भातचे निवेदनही सादर केले. सकाळी अकरा वाजता भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने महापालिका कार्यालयासमोर जमले होते. त्यानी यावेळी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आमदार सेठ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यानी यावेळी केली. यावेळी अॅड. प्रविण करोशी, राजू भातकांडे आदी उपस्थित होते.

आमदार सेठ यांची मंगळवारी न्यू गांधीनगर परिसरात प्रचारसभा होती. या प्रचारसभेवेळी सेठ यांच्यासोबत त्यांच्या समर्थकानी मोठी गर्दी केली होती. या गर्दीतून बाहेर पडताना सेठ यांची दमछाक झाल्याचेही व्हिडिओत दिसून आले. पण सेठ गर्दीतून बाहेर पडत असताना तेथील कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली. त्यानी देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर निदर्शनास येते. पण आमदार सेठ यांच्या मते कार्यकर्त्यानी तशा घोषणा दिल्या नाहीत. कार्यकर्ते माझ्या व माजी नगरसेवक अजीम पटवेगार यांच्या नावाच्या घोषणा देत होते असा त्यांचा दावा आहे.

कोणत्याही पद्धतीने सत्ता मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. बेळगावात सेठ कुटुंबियांचा सर्व समाजाशी सलोख्याचा संबंध आहे. या निवडणुकीत सर्व समाजाचे पाठबळ मला मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांचे जातीय ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून निवडणुकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यानी केला. हा प्रकार कोणी केला, याची माहिती येत्या महिनाभरात बाहेर काढणारच असेही त्यानी सांगितले.

Web Title: In the footsteps of Congress MLA Firoz Seth the announcement of Pakistan Zindabad