अभिनंदन यांना पाकने परत पाठवलं नसतं तर...; बीएस धनोवा यांनी सांगितली भारताची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीएस धनोआ यांनी सांगितलं की, मी अभिनंदनच्या वडीलांना वचन दिले होते की, आम्ही निश्चितपणे अभिनंदनला परत घेऊन येऊ.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भात एक सनसनाटी दावा केला आहे. ते म्हणालेत की, भारत हल्ला करेल अशा भीतीनेच पाकिस्तानने गडबडीत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे परत सुपुर्द केलं होतं. पाकिस्तानी खासदारांच्या या वक्तव्यावर भारतीय वायुसेनेच्या माजी चीफ बीएस धनोआ यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलंय की, पाकिस्तानी खासदाराने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबाबत ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या एकदम खऱ्या आहेत. कारण त्यावेळी आमचा पवित्रा एकदम आक्रमक होता आणि आम्ही त्यावेळी हल्ल्याची तयारी करत होतो. अभिनंदन यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं होतं. 

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये काश्मीरवर सुरु होती Online मीटिंग, हॅकर्सनी दिला 'जय श्रीराम'चा नारा
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीएस धनोआ यांनी सांगितलं की, वायुसेनेने पाकिस्तानच्या फॉर्वर्ड ब्रिगेडवर हल्ल्याची पुर्ण तयारी केली होती. त्याचदरम्यान भारतीय सैन्याचा पवित्रा खुपच आक्रमक होता. त्यांनी म्हटलं की,  मी अभिनंदनच्या वडीलांना वचन दिले होते की, आम्ही निश्चितपणे अभिनंदनला परत घेऊन येऊ. पाकिस्तानी खासदारांनी जे म्हटलंय ते खरंय त्यावेळी आमचा पवित्रा एकदम आक्रमक होता आणि त्यांना आमच्या सैन्याच्या ताकदीचा अंदाजही होता. पाकच्या सैन्याची सफाई करायला आम्ही पूर्णपणे तयार होतो. 

एएनआयसोबत केलेल्या बातचितीमध्ये बीएस धनोवा यांनी म्हटलं  की, बालाकोट एयरस्ट्राईकनंतर पाकिस्तानवर कुटनीती आणि रणनीतीचा दबाव होता. आपल्याला 1999 मधील कारगिल घटना लक्षात आहे जेंव्हा पाकिस्तानने अंतिम वेळेला धोका दिला होता, म्हणूनच आम्ही सतर्क होतो. त्यांनी म्हटलं की मी अभिनंदनच्या वडिलांसोबत काम केलं आहे. मी त्यांना वचन दिलेलं की आम्ही अभिनंदनला परत आणू. 

बीएस धनोवा यांची ही प्रतिक्रीया आली आहे ती पाकिस्तानच्या खासदारांच्या संसदेतील एका वक्तव्यावर. पाक खासदार अयाज सादिक यांनी म्हटलं की भारतीय विंग कमांडर अभिनंदनच्या संदर्भात आयोजित बैठकीत स्वत: पंतप्रधान इमरान खान यांनी येण्यास नकार दिला होता. त्यात पाकचे आर्मी चीफ आले होते मात्र त्यांचे पाय थरथरत होते आणि चेहऱ्यावर घाम फुटला होता. भारत हल्ला करेल अशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी म्हटलं की परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटलं की अभिनंदन यांना जर परत पाठवलं नाही तर भारत रात्री 9 वाजचा पाकिस्तानवर हल्ला करेल. 

हेही वाचा - माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे दुसऱ्यांदा बोहल्यावर; ब्रिटिश मैत्रिणीसोबत थाटला संसार

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीवर हल्ला झाला होता, ज्यात 40 अर्धसैनिक दलाचे जवान शहिद झाले होते. यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेच्या जवानांनी याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील बालाकोटवर अर्ध्या रात्री हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांनी जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केलं होतं. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये भारताला उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या हल्ल्यात भारतानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या दरम्यानच विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पकडले गेले. त्यांना पाक सैन्याने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने पाकवर खुपच दबाव टाकला होता, ज्यामुळे अभिनंदन यांना परत भारताकडे सुपुर्द करावं लागलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former IAF Chief BS Dhanoa we were in position to wipe out pakistans forward brigades