PM मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्याने राजीनामा देऊन केला भाजप प्रवेश

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर पंतप्रधान झाले तेव्हाही अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयात आले होते. 

नवी दिल्ली  - गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा हे आता राजकारणात उतरले आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शर्मा यांना भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सरकारमध्ये पदही दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. 

अरविंद कुमार शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अति विश्वसनीय अधिकाऱ्यांपैकी एक होते. उत्तर प्रदेशच्या महू जिल्ह्यातल्या अरविंद कुमार शर्मा यांची निवृत्ती 2022 ला होती. मात्र त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 

प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृ्त्ती घेतल्यानंतर गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी भाजप प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेश सचिव आणि प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितलं की, माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी गुरवारी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

हे वाचा - समितीच्या निष्पक्षतेवर शंका; शरद पवारांनी सरकारला दिला तटस्थ सदस्य निवडण्याचा सल्ला

उत्तर प्रदेशच्या 12 व्या विधान परिषदेच्या जागांसाठी 28 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी आहे. भाजपने आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने त्यांच्या दोन्हीही उमेदवारांची घोषणा केली आहे.

अरविंद कुमार शर्मा हे 1988 च्या गुजरात केडर बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शर्मा यांनी 2001 ते 2013 पर्यंत गुजरातमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर पंतप्रधान झाले तेव्हाही अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयात आले होते. आताही ते पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम बघत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former ias office arvind kumar sharma join bjp after resign