माजी राष्ट्रपती घेणार आता आरएसएसच्या स्वयंसेवकाचे 'बौद्धिक'

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

भारताच्या माजी राष्ट्रपतींना नागपूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारले असल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.

नागपूर - भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपतींना नागपूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधण्याचे आमंत्रण दिल्याचे व त्यांनी ते स्वीकारले असल्याचे संघाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे.

संघाच्या तृतीय वर्षाच्या शिक्षा वर्गामध्ये ६०० स्वयंसेवक सहभागी होणार असून त्यांना प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. मतं विरोधी असणं म्हणजे शत्रू असणे असे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्व यांच्यासंबंधात निर्माण केल्या गेलेल्या प्रश्नांना हे मुखर्जींनी निमंत्रण स्वीकारणं हे उत्तर आहे, असे मत संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

सात जून रोजी हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असला तरी, प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयानं याबाबत अद्याप काही स्पष्ट केलेले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसकडून अनेक पदावर काम केलेले प्रणव मुखर्जी जुलै 2017 मध्ये राष्ट्रपती पदावरून पायउतार झाले. मुखर्जी यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेससाठी काम केलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा असलेले व राष्ट्रपतीपदासारखे सर्वोच्च पद भूषवलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Former President To Address Rss Members