'दलितांचे तारणहार' बुटा सिंग अनंतात विलिन; PM मोदी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

तब्बल 8 वेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

नवी दिल्ली : दलितांचे तारणहार समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता सरदार बूटा सिंग यांचं आज शनिवारी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 21 मार्च. 1934 रोजी पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापुर गावात त्यांचा जन्म झाला होता. तब्बल 8 वेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, श्री बुटा सिंग हे एक अनुभवी प्रशासक आणि गरीब आणि दलितांच्या हितासाठी झटणारा एक प्रभावी आवाज होता.  त्यांच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती तसेच समर्थकांप्रती माझ्या सहवेदना आहेत. 

देशाच्या राजकारणात सध्या नाजूक अवस्थेत असलेल्या तसेच आपल्या प्रभावी अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसच्या अशा अवस्थेत दलित नेते सरदार बुटा सिंग यांचं असं अचानक जाणं ही पक्षासाठी मोठी हानी मानली जात आहे. 

त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, सरदार बुटा सिंगजींच्या निधनाने एक सच्चा जनसेवक आणि निष्ठावान नेता आपण गमावला आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाची सेवा आणि जनतेच्या भलाईत समर्पित केलं आहे. त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी त्यांचं सदैव स्मरण केलं जाईल. अशा कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 224 रुग्णांचा मृत्यू; देशात आज लशीकरणाचे 'ड्राय रन'
नेहरु-गांधी घराण्याचे विश्वासार्ह राहिलेल्या बुटा सिंग यांनी भारत सरकार मध्ये केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रिडा मंत्री तसेच इतर अनेक पदभार हाताळले आहेत. याशिवाय ते बिहारचे राज्यपाल तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष देखील होते. या साऱ्या पदांवर त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली आहे. काँग्रेस पक्षातील या वरिष्ठ नेत्यास दलितांचा तारणहार म्हटलं जायचं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Union Minister Congress leader Buta Singh passes away pm modi rahul gandhi pays tribute

टॉपिकस