अमरनाथ यात्रेदरम्यान चार भाविकांचा मृत्यू

पीटीआय
बुधवार, 24 जुलै 2019

- गेल्या चोवीस तासांत अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा झाला मृत्यू.

-  मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या पोचली 30 वर.

श्रीनगर : गेल्या चोवीस तासांत अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या 30 वर पोचली आहे. तीन भाविकांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर अन्य एका भाविकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

एक जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला असून, ती 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेदरम्यान 40 जण विविध कारणांमुळे आजारी पडले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींना सुटी देण्यात आली आहे. अमरनाथ गुहा परिसरात ऑक्‍सिजनची कमतरता असल्याने काही भाविकांना त्रास होत असल्याचे लष्कराने सांगितले. यात्रेच्या मार्गात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या आरोग्याची काळजीही घेतली जात असल्याचे लष्कराने सांगितले.

दरम्यान, भाविकांचा 23 वा जत्था बुधवारी भगवतीनगर येथून अमरनाथला रवाना झाला. त्यात 626 महिला, पाच मुले आणि 141 साधूंचा समावेश आहे. आज सकाळी भाविकांना घेऊन शंभर वाहने कडक सुरक्षाव्यवस्थेत अमरनाथकडे रवाना झाल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four devotees die during Amarnath Yatra