भाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ!

Modi_Shah
Modi_Shah

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (आरएलपी)ने शनिवारी (ता.२६) राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. 

आरएलपीचे अध्यक्ष हनुमान प्रसाद बेनीवाल यांनी याबाबत स्वत: माहिती दिली. गेल्या चार महिन्यांत एनडीए सोडणारा हा चौथा पक्ष ठरला आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीस भाजपच्या सर्वात जुन्या मित्रपक्षाने म्हणजे शिरोमणी अकाली दलाने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून एनडीए सोडली. मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या हरसिमरत कौर यांनी याच मुद्द्यावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पी.सी. थॉमस यांच्या नेतृत्वातील केरळ कॉंग्रेसनेही एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. डिसेंबरच्या सुरवातीला आसाममधील बोडोलँड पीपल्स फ्रंटनेही एनडीए सोडली. २०१४च्या तुलनेत आता एनडीएत फक्त १६ पक्ष राहिले आहेत. त्यापैकी काही पक्ष असे आहेत की, जे नुकतेच एनडीएत सहभागी झाले आहेत. अशा पक्षांमध्ये बिहारमधील जीतनराम मांझीचा हम, मुकेश साहनींचा व्हीआयपी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आसाममध्ये नुकत्याच झालेल्या बीटीसी निवडणुकीनंतर प्रमोद बोरो यांच्या युनाइटेड पीपल्स पार्टीने भाजपबरोबर युती केली आहे.

२०१४ नंतर या पक्षांनी सोडली साथ
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात एनडीएने मोठा विजय मिळविला होता, पण हळूहळू त्यांचे मित्रपक्ष बाहेर पडू लागले. हरियाणा जनहित कॉंग्रेसने एनडीएतून बाहेर पडत याची सुरवात केली होती. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काही महिन्यांतच कुलदीप बिश्नोई यांनी एनडीएचा निरोप घेतला. २०१४ मध्ये तमिळनाडूच्या एमडीएमकेनेही भाजपने तमिळींविरोधात काम केल्याचा आरोप करत एनडीए सोडली. त्यानंतर तमिळनाडू विधानसभा निवडणुकांपूर्वी २०१६मध्ये डीएमडीके आणि रामदॉस पीएमके या आणखी दोन पक्षांनी भाजपची साथ सोडली. 

त्यानंतर आंध्र प्रदेशात अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेनेने एनडीएला रामराम ठोकला. त्यानंतर २०१६मध्ये केरळच्या रिवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीने, २०१७मध्ये महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षाने, नागालँडमधील नागा पीपल्स फ्रंट, बिहारमध्ये जीतनराम मांझींच्या हमने एनडीएचा निरोप घेतला होता, पण २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मांझी आणि साहनी यांनी पुन्हा एनडीएमध्ये परतले.

२०१८ मध्ये बसला मोठा धक्का 
मार्च २०१८मध्ये एनडीएला मोठा झटका बसला. त्यांचा मोठा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसमने सोडचिठ्ठी दिली होती. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी मोदी सरकारवर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले नाही, असे सोडचिठ्ठी देताना म्हटले होते. त्यानंतर त्याचवर्षी पश्चिम बंगालमधील भाजपचा सहयोगी असलेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चानेही एनडीएशी संबंध तोडले. नंतर कर्नाटक प्रज्ञानवथा पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडत वेगळा मार्ग शोधला. २०१९च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या उपेंद्र कुशवाह (आरएलएसपी) यांनीही एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमधील ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आणि योगी सरकारची साथ सोडली होती. 

त्याच वर्षी म्हणजे २०१८मध्ये, भाजप स्वत: जम्मू-काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्याशी मतभेद झाले. त्यामुळे पीडीपी आणि भाजप हे एकमेकांपासून विभक्त झाले. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या वादानंतर भाजपचा ३० वर्षांपासून मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेने एनडीएला 'जय महाराष्ट्र' केला. आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com