खुशखबर! आता वीज मिळणार मोफत

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

201 ते 400 युनिटपर्यंतच विजेचे दर निम्म्याने कमी केले आहेत. यात दिल्ली सरकार 50 टक्के अंशदान देणार आहे. दिल्ली सरकारने काल विजेवरील निश्‍चित शुल्कातही घट करण्याचे जाहीर केले होते. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेच्या दरात कपात करून दिल्लीकरांना खूषखबर दिली आहे. 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. 201 ते 400 युनिटपर्यंतच विजेचे दर निम्म्याने कमी केले आहेत. यात दिल्ली सरकार 50 टक्के अंशदान देणार आहे. दिल्ली सरकारने काल विजेवरील निश्‍चित शुल्कातही घट करण्याचे जाहीर केले होते. 

केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात दिल्ली हे सर्वांत स्वस्त वीज देणारे राज्य ठरले आहे, असे सांगत या निर्णयाचे वर्णन त्यांनी ऐतिहासिक असे केले. यामुळे "आम आदमी'ला (सामान्य नागरिक) दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. ज्या ग्राहकांचा वीज वापर प्रत्येक महिन्याला 200 युनिटपर्यंत आहे त्यांना "फ्री लाइफलाइन इलेक्‍ट्रिसिटी' या योजनेखाली वीजबिलापासून मुक्तता मिळणार आहे.

तसेच "जर अतिमहत्त्वाच्या आणि मोठ्या राजकारण्यांना मोफत वीज मिळत असेल तर कोणी काहीच बोलत नाही. मग सामान्य माणसाला वंचित का ठेवायचे? हा निर्णय घेऊन मी चूक करीत आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. "शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सेवांप्रमाणेच घरातील दिवे आणि पंखे सुरू करण्यासाठी वीज मिळणे आवश्‍यक आहे, असे ट्विट दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी "#PehleHalfAbMaaf' या हॅशटॅगने पोस्ट केले आहे. 

लाभार्थी दिल्लीकर... 

- उन्हाळ्यात ज्यांचा वीज वापर 200 युनिटपेक्षा कमी आहे, अशा 33 टक्के वीज ग्राहकांना 
- हिवाळ्यात 200 युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या 70 टक्के ग्राहकांना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Electricity will be Provided in Delhi Decision by Kejriwal Government