esakal | आता दिल्लीकरांना लस मिळणार मोफत, केजरीवालांची घोषणा

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

१ मेपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाईल. १ कोटी ३४ लाख लसींची मागणी केली असून मोफत लसीकरणामुळे सामान्य जनतेला फायदा होईल.

आता दिल्लीकरांना लस मिळणार मोफत, केजरीवालांची घोषणा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या दिल्लीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, आणि ती लस मोफत देण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. देशभरात कोरोनाचा सर्वात जास्त फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यापैकी दिल्ली हे एक आहे.

यावेळी केजरीवाल म्हणाले की, १ मेपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाईल. १ कोटी ३४ लाख लसींची मागणी केली असून मोफत लसीकरणामुळे सामान्य जनतेला फायदा होईल. तसेच एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही.

हेही वाचा: ‘केंद्र सरकार खरे आकडे लपवतेय’; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर

लसीकरणाचा तिसऱ्या टप्पा १ मेपासून सुरू होत असून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या लसीचे दर जाहीर केले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या लसीसाठी राज्य सरकारला ४०० रुपये, खासगी हॉस्पिटल्सना ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची किंमत राज्य सरकारसाठी ६०० रुपये आणि खासगी हॉस्पिटल्ससाठी १२०० रुपये असणार आहे. दुसरीकडे या दोन्ही लसी केंद्र सरकारला फक्त १५० रुपयात मिळणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकांचा भडीमार सुरू केला आहे.

हेही वाचा: "निवडणूक आधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे"

केजरीवाल यांनीही सर्वांसाठी एकाच दरात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे आयुष्य पडलं आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गोवा, केरळ, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि हरयाणा या राज्यांनी याआधीच मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी इतर राज्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. यानंतर आता त्यांनी देशातील मोठ्या उद्योगपतींनाही पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टाटा, बिर्ला, अंबानी, हिंदुजा, महिंद्रा यांच्यासह इतर काही उद्योगपतींना पत्र लिहून ऑक्सिजनसाठी मदत मागितली आहे. ''तुमच्याकडे मेडिकल ऑक्सिजन आणि टँकर असतील, तर ते दिल्ली सरकारला द्या. तुमच्याकडून जी मदत करता येईल, ती मदत नक्की करा, अस त्यांनी म्हटलं आहे.