'फ्रिडम 251' कंपनीच्या संचालकाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक

पीटीआय
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

गाझियाबाद - प्रचंड जाहिरात करून केवळ 251 रुपयांत स्मार्ट फोन देण्याचे आश्‍वासन देऊन पैसे गोळा करणाऱ्या "रिंगींग बेल्स'या कंपनीचा संचालक मोहित गोयल याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केले आहे.

गाझियाबाद - प्रचंड जाहिरात करून केवळ 251 रुपयांत स्मार्ट फोन देण्याचे आश्‍वासन देऊन पैसे गोळा करणाऱ्या "रिंगींग बेल्स'या कंपनीचा संचालक मोहित गोयल याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केले आहे.

गाझियाबाद येथील आयम एंटरप्रायजेस या कंपनीने गोयलविरुद्ध 16 लाख रुपयांना फसविल्याच्या तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गोयलला ताब्यात घेतले आहे. याबाबत गाझियाबादचे पोलिस निरीक्षक मनिष मिश्रा यांनी माहिती दिली. गोयल याच्या कंपनीकडून विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी आयम एंटरप्रायजेसने आरटीजीएसद्वारे रिंगींग बेल्स कंपनीकडे 30 लाख रुपये दिले होते. मात्र त्यापैकी केवळ 13 लाख रुपयांची उत्पादनेच त्यांना मिळाली. अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांनी उर्वरित रकमेची उत्पादने पाठविली नाहीत. त्यामुळे त्यांनी रिंगींग बेल्सविरुद्ध पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. उर्वरित रक्कम किंवा उत्पादने मागितल्यानंतर आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही "आयम'ने तक्रारीत म्हटले आहे.

"फ्रिडम 251' हा 251 रुपयांतील स्मार्ट फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिंगींग बेल्सने केली होती. त्यानंतर 30 हजार ग्राहकांनी या फोनसाठी बुकिंग केले होते. तर कोट्यवधी जणांनी फोन खरेदी करण्यात उत्सुकता दर्शविली होती, असा दावा कंपनीने केला आहे.

Web Title: 'Freedom 251' MD arrested