विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याला अटक 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

कार्तिकला त्याच्या वाईट कामगिरीबद्दल वरिष्ठांनी खडासावले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केले, असे पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या 23 वर्षीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 2 मे ला मुंबईवरून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा खोटा फोन करून त्याने अफवा पसरवली होती. कार्तिक माधव भट असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मूळचा पुण्याचा आहे.

कार्तिकला त्याच्या वाईट कामगिरीबद्दल वरिष्ठांनी खडासावले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केले, असे पोलिसांनी सांगितले.

 indigo

2 मे ला इंडिगोच्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो कॉम्प्लेक्समधील कार्यालयात मुंबईहून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. त्यामुळे भीतीचे व गोंधळाचे वातावरण पसरले. या फोनमुळे मुंबईहून येणाऱ्या सर्व विमानांची कसून तपासणी करण्यात आली व अशा प्रकारचा कोणताही बॉम्ब सापडला नसून ही एक अफवा होती, असे जाहीर करण्यात आले. कार्तिकने ज्या नंबरवरून फोन केला होता, त्या नंबरचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पकडले.

कार्तिकने हॉस्पिटॅलिटी व एव्हिएशनचा डिप्लोमा केला असून त्यानंतर त्याने एव्हिएशन विभागात काम केले व सध्या तो इंडिगोमध्ये ग्राहक सेवा अधिकारी म्हणून पुण्याच्या विमानतळावर कामाला होता. त्याला त्याच्या कामात सुधारणा करण्याची गरज असल्याची सूचना देण्यात आली होती. याच नैराश्यातून त्याने ही अफवा पसरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने फोन केलेले सीमकार्डही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे.

Web Title: Frustrated Indigo employee makes hoax bomb call arrested