सुकमातील हुतात्म्यांसाठी गंभीर, अक्षय, सोनमचा पुढाकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

या सर्व हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी गौतम गंभीर घेत असल्याचे त्याच्या प्रसिद्धी व्यवस्थापकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मुंबई : सुकमा येथे हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने उचलली आहे. तसेच, हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी केले आहे. 

छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) 25 जवान हुतात्मा झाले. या सर्व हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी गौतम गंभीर घेत असल्याचे त्याच्या प्रसिद्धी व्यवस्थापकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

"अलीकडच्या सुकमा हल्ल्यात आपल्या शूर जवानांनी त्यांच्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहण्याची तुमची इच्छा असेल सरकारच्या bharatkeveer.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले योगदान द्या, आणि जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ते एकटे नाहीत हे दाखवून द्या," असे आवाहन अक्षय कुमार आणि सोनम कपूरने एका ऑडिओ क्लिपद्वारे केले आहे. 

दरम्यान, बनावट संकेतस्थळांवरून मदतीचे आवाहन करून देणग्या मागणाऱ्यांनी जवानांच्या बलिदानाचा गैरफायदा घेऊ नये असेही अक्षय कुमारने म्हटले आहे. 
 

Web Title: gambhir, akki, sonam kapoor come forward for martyrs' families