कुख्यात डॉन मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निलंबितांवर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'कारागृहात अशी घटना घडणे हे फारच गंभार आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'

बागपत - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि माफिया प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मुन्ना बजरंगी याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या करण्याच्या आरोपात मुन्ना बजरंगी कारागृहात बंद होता. बागपतच्या कारागृहात आज (ता. 9 जुलै) सकाळी ही हत्या झाली. कारागृह प्रशासनात या हत्येने खळबळ माजली आहे. 

जेलर निलंबित -
या हत्येनंतर उत्तर प्रदेश सरकारने बागपत जिल्हा कारागृहाचे जेलर, कारागृह उप अधिक्षक आणि चार कारागृह कर्मचारी यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निलंबितांवर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'कारागृहात अशी घटना घडणे हे फारच गंभार आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'

बजरंगीवर सात लाखांचं बक्षिस होतं -
भाजप चे आमदार यांची हत्या याशिवाय देखील बजरंगीवर हत्या, अपहरण आणि वसूली असे आरोप होते. उत्तर प्रदेश पोलिस, एसटीएफ आणि सीबीआय बजरंगी च्या शोधात होते. त्याच्यावर सात लाखाचं बक्षिस होतं.  

पत्नी सीमाने व्यक्त केली होती भीती - 
गेल्या रविवारी बजरंगीला झांसी तुरुंगातून बागपत आणले होते. त्याला कुख्यात सुनील राठी आणि विक्की सुंहेडा यांच्या बरॅक मध्ये ठेवण्यात आले होते. मुन्ना बजरंगीची पत्नी सीमा सिंह हीने 29 जून ला पत्रकार परिषद घेऊन कारागृहात त्याची हत्या होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती. मुन्नाची सुरक्षा वाढविण्यात यावी अशी विनंतीही तिने केली होती. 

मृत्यूच्या दाढेतून सुटला होता डॉन बजरंगी -
मुन्ना बजरंगी याला दिल्ली आणि युपी पोलिस यांच्या संयुक्त टीमने वीस वर्षांपूर्वी एनकाउंटरमध्ये ठार केल्याचा दावा केला होता. ही बातमी देखील प्रसारित झाली होती. बजरंगी याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले असता त्याने तिथे मात्र डोळे उघडले.

11 सप्टेंबर 1998 मध्ये दिल्लीहून हरियाणा येथे जाताना समयबादली ठाणे क्षेत्रात झालेल्या पोलिसांसोबतच्या चकमकीत मुन्नाला सहा गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी त्याला मृत घोषित करुन राममोहन लोहिया हॉस्पिटलला पाठवले होते. पण मिडीया समोरुन नेताना मुन्नाने परत डोळे उघडले. तात्काळ मुन्नावर उपचार सुरु करण्यात आले होते.

हॉस्पिटलमधून बरे होऊन निघाल्यावर तीस हजारी कोर्टात हजेरीच्या दरम्यान मुन्नावर हल्ला झाला होता. विषाचे इंजेक्शन मारण्याचा प्रयत्न करुन मुन्नाला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मुन्ना बेशुध्दही झाला होता, पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर तो बरा झाला. 

इयत्ता पाचवीत असतानाच मुन्ना बजरंगीने गुन्हेगारीच्या विश्वात पाऊल ठेवले होते. 1984 मध्ये मुन्नाने पहिल्यांदा एका व्यापाऱ्याची हत्या केली होती. तेव्हा पासून माफिया गणराज सिंह याच्या हाताखाली त्याने गुन्हेगारीचे काम सुरु केले होते.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

   

Web Title: gangster munna bajrangi shot dead at bagpat up jail