गंभीर पुन्हा झाला ट्रोल; 'तू जिलेबी खा' म्हणत नेटकऱ्यांनी घेतलं तोंडसुख!

टीम ई-सकाळ
Wednesday, 4 December 2019

बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफायची घोषणा केली. या सेवेमार्फत नागरिकांना दर महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफायची घोषणा केली. या सेवेमार्फत नागरिकांना दर महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सेवेचा फायदा विद्यार्थी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या निर्णयाला विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरने केजरीवाल हे खोटारडे असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्री केजरीवाल हे लोकांची दिशाभूल करत आहेत. गेल्या साडेचार वर्षात जी कामे केली नाहीत, ती शेवटच्या दोन महिन्यात उरकून वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा इरादा असल्याचे खासदार गंभीरने म्हटले आहे.

मात्र, गंभीरचे हे वक्तव्य दिल्लीकरांनी त्याच्यावरच उलटवले आहे. आणि ट्विटर या सोशल मीडिया साईटवर 'तू जिलेबी खा' असे हिणवत तोंडसुख घेण्यास सुरवात केली आहे.

नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, केजरीवाल सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्याअगोदर दिलेल्या वचनांची पूर्तता करत असेल, तर त्यात चुकीचं काय? असा सवालही उपस्थित केला आहे. तर एकाने म्हटले आहे की, भाजप सरकार केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलं. मात्र, त्यांनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. तर एका नेटकऱ्याने गंभीरला फ्री वाय-फायपेक्षा फ्री जिलेबी मिळावी असे वाटत आहे, असा टोमणा मारला आहे.  

मध्यंतरी दिल्ली सरकारने दिल्लीतील हवाप्रदुषणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस उपस्थित राहण्यापेक्षा इंदूर कसोटीच्या सूत्रसंचालन करणे गंभीरने पसंत केले. आणि तेथे गेल्यावर जतीन सप्रू आणि भारताचा महान फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सोबत जिलेबी खाण्याचा आनंद लुटला. यावरून गौतम दिल्लीच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याने नेटकऱ्यांनी या अगोदरही त्याला ट्रोल केले आहे. राजकीय क्षेत्रात गंभीरने पाऊल ठेवल्यापासून आपल्या वर्तणुकीमुळे तो कायम चर्चेत येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gautam gambhir trolled on social media after commenting on AAP Government