जीडीपी आणि जीवनमानाचा दर्जा घसरणार - वर्ल्ड बँक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मागील सहा दशकांतील सरासरी तापमान वाढीच्या आधारावर बनविण्यात आलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत देशाच्या आतील भागातील तापमानात वाढ होणार असून किनारी प्रदेशातील तापमानात घट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे तापमानवाढ आणि मान्सूनवर परिणाम होऊन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये 2050 पर्यंत 2.8 टक्क्यांनी घटणार असून देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या जीवनमानात घट होणार आहे. जागतिक बँकेच्या 'दक्षिण आशिया हॉटस्पॉट : तापमान आणि पर्जन्यमानातील बदलाचा जीवसृष्टीवरील परिणाम' या नावाने प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालातील वर्ल्ड बँकेचे अर्थतज्ञ संशोधन मुथुकुमारा मणी, अर्थतज्ञ सुषेणेजित बंडोपाध्याय, शून चोनबायशी, अनिल मार्कंद्या आणि संशोधक थॉमस मोसीर यांनी केले आहे. 

अहवालानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना हवामानातील बदलाचा फटका बसणार आहे. मागील सहा दशकांतील सरासरी तापमान वाढीच्या आधारावर बनविण्यात आलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत देशाच्या आतील भागातील तापमानात वाढ होणार असून किनारी प्रदेशातील तापमानात घट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. अहवालानुसार मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील राहण्यास अनुकुल परिस्थितीत 9 टक्क्यांची घट होईल. त्यापाठोपाठ राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक असेल. देशातील अतिउष्ण जिल्ह्यात विदर्भातील 7 जिल्ह्याचा समावेश असेल. यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, राज नांदगाव, दुर्ग समावेश असेल तर उरलेले 3 जिल्हे छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मधील असतील. 

अहवालानुसार देशात 2050 पर्यंत अतिउष्ण कार्बन युक्त परिस्थिती असेल असे अनुमान काढण्यात आलेल्या भागात सध्या 60 कोटी लोक राहत आहेत. तसेच दक्षिण आशियातील अर्धी लोकसंख्या या प्रदेशात सध्या वास्तव्यास आहे. पर्यावरणाबाबत मानकांचे पालन करण्यात आले नाही तर 2050 पर्यंत भारतातील तापमानात 1.5 ते 3 डिग्रीने वाढ होईल. पॅरिस करारातील अटींचे पालन करण्यात आल्यास 2050 पर्यंत 1 ते 2 डिग्रीने तापनामात वाढ होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 

Web Title: GDP and Living Standard decreased because climate change world bank