गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिला

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

गुजरातचे पोलिस महासंचालक पी पी पांडे यांना राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.

गांधीनगर (गुजरात) - गुजरातचे पोलिस महासंचालक पी पी पांडे यांना राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गुजरातच्या पोलिस महासंचालकपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे.

बहुचर्चित सोहराबुद्दीन-तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात जोहरी आरोपी होत्या. मात्र, राज्य सरकारने जोहरी यांना फिर्यादी करण्याची परवानगी नाकारल्याने सीबीआय न्यायालयाने मार्च 2015 मध्ये त्यांना निर्दोष ठरविले. जोहरी या भारतीय पोलिस सेवेच्या 1982 सालच्या तुकडीतील आहेत. पांडे यांच्याकडे एप्रिल 2016 पासून प्रभारी पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी होती.

जून 2004 मधील एका बनावट चकमक प्रकरणात पांडेंवर आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये पांडे यांच्याकडे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पांडे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याशिवाय त्यांना पदावरून हटविता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, राज्याच्या महाधिवक्‍त्याने त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचे सांगितले होते.

Web Title: Geetha Johri - Gujarat's first woman ips